होमपेज › Pune › ‘बीएमसीसी’त पर्यावरणपूरक बायोगॅस प्रकल्प

‘बीएमसीसी’त पर्यावरणपूरक बायोगॅस प्रकल्प

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 12:18AMपुणे ः प्रतिनिधी 

बीएमसीसी महाविद्यालयास 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवारी महाविद्यालयात बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. बीएमसीसी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, ज्येष्ठ उद्योजक नितीन देशपांडे आणि ट्रायोकेम, ई-वेस्ट ग्लोबल, गंगोत्री, वायू आणि जी.आर. ग्रीन लाईफ या संस्थांच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकार करण्यात आला आहे. 

महाविद्यालयातील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन पुणे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे सदस्य किरण शाळीग्राम, के.पी.आय.टी. ग्रुपचे चेअरमन रवी पंडित, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे (बी.एम.सी.सी.) प्राचार्य चंद्रकांत रावळ आदी उपस्थित होते. 

महाविद्यालयात प्रतिदिन 22.5 किलो अन्न कचरा जिरवण्याची क्षमता असलेले यंत्र बसविण्यात आले आहे. यातून वर्षाचे 19 किलोचे  22 सिलिंडर इतके इंधन निर्माण होईल. यंत्रामध्ये 3000 लिटर क्षमतेचा डायजेस्टर व 3000 लिटर गॅस साठवणूक करणारा फुगा वापरला असून हे यंत्र वापरताना विजेचा वापर करावा लागत नाही, कचराही जसाच्या तसा टाकला तरी चालणार आहे. यातून अत्यंत ताकदीचे जैविक खत निर्माण होणार असून त्याचा वापर बागेसाठी होणार आहे, अशी माहिती प्राचार्य प्राचार्य चंद्रकांत रावळ यांनी दिली.