होमपेज › Pune › भाजपचा वर्षभरातील भ्रष्टाचाराचा हिशोब नावानिशी बाहेर काढणार

भाजपचा वर्षभरातील भ्रष्टाचाराचा हिशोब नावानिशी बाहेर काढणार

Published On: May 18 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 12:59AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपची सत्ता येऊन वर्षे झाले आहे. त्या काळात त्यांनी शहराचे नुकसान केले करीत स्वत:ची घरे भरली आहेत. त्या भ्रष्ट पदाधिकार्‍यांचा नावानिशी हिशोब बाहेर काढणार आहे, असा इशारा नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी गुरूवारी (दि.17) दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक साने यांना निवडीचे पत्र महापौर नितीन काळजे यांनी गुरूवारी दिले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजू मिसाळ, मोरेश्‍वर शेडगे, जावेद शेख, पंकज भालेराव, नगरसेविका वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, सुलक्षणा धर आदी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षनेते अजित पवार यांनी त्यांची या पदावर निवड केल्याचे बोलले जात आहे. 

साने म्हणाले की, भाजपच्या भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठीच पक्षाने मला दुसर्‍या वर्षी या पदावर संधी दिली आहे. चांगल्या कामांना पाठींबा देणार आहे. भ्रष्ट कामे किंवा काही तक्रारी असल्यास नागरिकांनी कागदपत्रांसह तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. सत्ताधार्‍यांवर ‘कचर्‍याचे भूत’ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात असलेली यंत्रणाच सध्या शहरात कचरा साफसफाईचे काम करीत आहे. आमच्या काळात शहराला ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणात देशात नववे स्थान मिळाले होते. छोटे-छोटे 60 ते 65 ठेकेदारांना घरी बसवून मोठ्या दोन ठेकेदारांना काम देण्याचा घाट निव्वळ टक्केवारीची लोणी खाण्यासाठी केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.  

तसेच, सशुल्क वाहन तळ (पे अ‍ॅण्ड पार्क) या नव्या ‘पार्किंग पॉसिली’ला राष्ट्रवादीचा तीव्र विरोध आहे. शहरात पार्किंगची व्यवस्था नसताना ही योजना राबविणे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुट करण्यासारखे आहे, असा आरोप त्यांनी केला. या पुढे दररोज दोन तास विरोधी पक्ष दालनात हजर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सत्ताधार्‍यांसोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक ‘मॅनेज’ असल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जागेवर डल्ला मारण्याचा भाजपचा डाव

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलनिकरणाचा डाव सत्ताधारी भाजपने चालविला आहे. येथील सोन्यापेक्षा अधिक भावाच्या जमिनीवर डोळा ठेवून हे उद्योग केले जात आहेत. अद्याप येथील भूमिपुत्रांना 12.50 टक्के परतावा मिळालेला नाही. प्राधिकरणात पालिका सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून देते. मात्र, त्याचा ताबा पीएमआरडीए या दुुसर्‍याच प्राधिकरणाकडे देणे चुकीचे आहे, असे दत्ता साने म्हणाले.