Tue, May 21, 2019 12:39होमपेज › Pune › ‘भाजप’चे सोशल ‘चाणक्य’ गेम चेंजर ठरणार?

‘भाजप’चे सोशल ‘चाणक्य’ गेम चेंजर ठरणार?

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:18AMपुणे ः दिगंबर दराडे

भाजपने सुरू केलेले ‘सोशल अभियान’ हळूहळू विरोधकांना घायाळ करणार आहे. आताच ‘फिर एक बार मोदी सरकार’  अशा आशयाचे मेसेज फिरू लागले आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या ‘टीप्स’चा वापर करून सोशल मीडियावर सक्रिय होताना दिसत आहे. 2019 च्या निवडण्ाुकीची तयारी सरकार पातळीवर सुरू झाली आहे. मतदारयाद्या तयार करणे, दुरुस्त्या करणे आदी बाबींनी वेग घेतला आहे. त्यापाठोपाठ सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील सोशल मीडियावर सक्रिय होताना दिसत आहेत. भाजपच्या सोशल मेळाव्यानंतर अन्य पक्षांना देखील जाग आली असून, विविध उपक्रम राबविण्याची तयारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाबरोबर सोशल मीडियाचा वापरही अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कधी नव्हे एवढें महत्त्व सोशल मीडियाला आले आहे. पक्षीय पातळीवर मेळावे घेण्याची सुरुवात भाजपकडून करण्यात आली आहे. या मेळाव्याचे लोण आता कुठपर्यंत जाऊन पोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भाजपने सामाजिक मीडिया माध्यमांद्वारे पक्षाची विचारधारा मानणार्‍या लोकांना जोडले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पक्षाचा प्रचार, प्रसार आणि विचारधारा प्रसारित करण्याकरिता फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप यापैकी प्रभावी कृत्यांनी सिद्ध करण्याच्या सूचना सोशल टीमला दिल्या आहेत. पक्षाकडून आयटी सेल नियुक्त केले जात आहेत. यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यात येणार आहेत.  आगामी विजयात सोशल मीडिया हा अग्रस्थानी असावा, अशी अपेक्षा पक्षाध्यक्षांनी व्यक्‍त केली आहे. आयटी सेलकडे विविध माहितीचा खजिना असला पाहिजे. या माहितीचे विश्‍लेषण करून सुसंगत तर्क मांडणी करत ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. तरच याचा उपयोग पक्षाला होणार आहे. यामुळे सोशल मिडिया अतिशय तत्पर झाला पाहिजे ही भूमिका भाजपने घेतली आहे.  

केवळ सोशल मीडियावर विसंबून न राहता व्यक्ती, गाव, जिल्हा, शहर ते केंद्रापर्यंत माहिती पोहचवण्यासाठी कार्यकर्ता बांधण्याची जबाबदारी पक्षाने स्वीकारली आहे. ‘पंचायत ते पार्लमेंट’पर्यंत भाजपची सत्ता कायम राहण्यासाठी सोशल मीडियाने बूथनिहाय स्मार्टफोन स्वयंसेवक तयार केले जाणार आहेत.  

सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा संदेश, विचार आणि प्रसार तळागाळात पोचविण्यासाठी संकल्प, संघटन आणि नियोजनबद्ध संवादासह सायबर सेलची रचना करण्याचा पक्षांनी चंग बांधला आहे.  तर राष्ट्रवादीही ‘ई कार्यकर्ता’  तयार करणार आहे. सतत जागृत राहून वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावरील पक्ष व सरकारविरोधी व्हायरल’ बातम्यांना योजनाबद्ध प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्ता सज्ज करण्यात येत आहे.  उत्साह, शिस्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना आकर्षित करणारा मजकूर प्रसारित करण्याची जबाबदारी या सोशल सेलची राहणार आहे.  

टीकाकार सोशल मीडियावर कितीही टीका करत असले तरीही आज देशात इंटरनेटचा वापर करणार्‍यांची संख्या सुमारे 12 कोटींच्या आसपास आहे. सोशल मीडियाचा उपयोग करणार्‍यांची संख्याही 11 कोटींपेक्षाही जास्त आहे. फेसबुकचा वापर करणार्‍या 14 ते 45 वर्षे वयोगटातील युवा पिढीतील लोकांची संख्या 9 कोटींपेक्षा जास्त आहे. यापैकी एक तृतीयांश यूजर्स हे मोठ्या शहरातील आणि 11 टक्के यूजर्स छोट्या शहरातील आहेत. सोशल मीडियाशी संबंधित यूजर्सचा उद्देश फक्त खासगी बातचीत किंवा मनोरंजन करणे हा नाही तर 45 टक्क्यांपेक्षाही जास्त यूजर्स सोशल मीडियावर आशयघन राजकीय विश्लेषणही करतात. 

सोशल मीडियामध्ये फेसबुक,  लिंक्ड इन यासारख्या सोशल साईट्सचा वापर जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात जास्त आहे. याचा उपयोग राजकीय पक्षांनी करून घेण्यासाठी आखणी सुरू केली आहे. सोशल मीडियावर जेवढे लाईक मिळतील तेवढे आपण लोकप्रिय आहोत, असे राजकीय नेत्यांना वाटते. त्यामुळे असे लाईक्स मिळविण्यासाठीही ते सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.