Mon, Jun 17, 2019 03:11होमपेज › Pune › पिंपरीत ‘आरपीआय’च्या आग्रहामुळे  भाजप इच्छुकांची होणार निराशा?

पिंपरीत ‘आरपीआय’च्या आग्रहामुळे  भाजप इच्छुकांची होणार निराशा?

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 12:38AMनंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघाची जागा 2014 च्या निवडणुकीत भाजप -आरपीआयच्या जागावाटपात आमच्याकडे होती. चंद्रकांता सोनकांबळे यांचा केवळ अडीच हजार मतांनी पराभव झाला होता; मात्र या वेळी ही जागा रिपब्लिकन पक्ष 25 हजारांच्या मताधिक्याने जिंकेल, असे सांगत पक्षाध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  आरपीआय पिंपरीच्या जागेसाठी आग्रही राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपतर्फे इच्छुक असणार्‍या सीमा सावळे, वेणू साबळे, अमित गोरखे यांची निराशा होण्याची चिन्हे आहेत.

सन 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. सेनेने तयारी करत पिंपरी मतदारसंघावर दावा सांगितला; मात्र भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी अमर साबळे यांच्यासाठी हा मतदारसंघ मागून घेतला. त्याआधी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत झालेल्या पाडापाडीच्या राजकारणास प्रत्युत्तर म्हणून ज्येष्ठ नेते आझम पानसरे समर्थकांनी कमळ फुलविण्याचा प्रयत्न केला; मात्र या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी भाजपचे अमर साबळे यांचा 9 हजार 438 मतांनी पराभव करून विजयश्री खेचून आणली. बनसोडे यांना 60 हजार 970, तर साबळे यांना 51 हजार 502 मते मिळाली.  या मतदारसंघात रिपब्लिकन-डावी लोकशाही समिती च्या उमेदवारीसाठी आरपीआय (आठवले गट)च्या चंद्रकांता सोनकांबळे व लोकराजनीती मंचाचे मानव कांबळे यांच्यात जोरदार स्पर्धा झाली. मतदारसंघ कोणाला सोडावा याबाबत एकमत न झाल्याने मानव कांबळे जनता दल (धर्मनिरपेक्ष)तर्फे, तर चंद्रकांता सोनकांबळे आरपीआयतर्फे रिंगणात उतरल्या.  सोनकांबळे यांना 11 हजार 135, तर मानव कांबळे यांना 8 हजार 240 मते मिळाली.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती तुटल्यानंतर भाजपने तत्कालीन नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांच्या रूपाने पिंपरी मतदारसंघ आरपीआयला सोडला,  त्यामुळे 2009 च्या निवडणुकीत पराभूत झालेले व पुन्हा इच्छुक असलेले अमर साबळे यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरली, तरीही संघ परिवाराने शिलाई मशिन चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला; मात्र कमळाचे चिन्ह नसल्याचा फटका सोनकांबळे यांना बसला. राज्यात सेना-भाजप युती तुटली तरी दोघांना एकच मानणार्‍या मतदारांनी कमळाच्या अनुपस्थितीमुळे धनुष्यबाण चालवला, त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसमधून आयात केलेले गौतम चाबुकस्वार यांची लॉटरी लागली. आघाडी सरकार विरोधात असंतोष असला,

तरी चाबुकस्वार व सोनकांबळे यांच्यात होणारी मतविभागणी आपल्या पथ्यावर पडेल, असा फाजील आत्मविश्‍वास बाळगून राहिल्याने राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांना 2 हजार 335 मतांनी पराभूत व्हावे लागले. चाबुकस्वार यांना 51096, बनसोडे यांना 48761, तर सोनकांबळे यांना 47288 मते मिळाली.या मतदारसंघात भाजपतर्फे सीमा सावळे, वेणू अमर साबळे, अमित गोरखे हे तीव्र इच्छुक आहेत; मात्र या वेळी आरपीआय ही जागा 25 हजारांपेक्षा अधिक मतांनी जिंकेल, असा आत्मविश्‍वास व्यक्त करत पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी  आरपीआय या जागेसाठी आग्रही राहणार असल्याचे संकेत दिल्याने आता भाजपतर्फे इच्छुक असणार्‍यांची निराशा होणार आहे.