Sun, Jul 21, 2019 09:56होमपेज › Pune › भाजपची ‘वर्षा’वरील बैठक लांबणीवर

भाजपची ‘वर्षा’वरील बैठक लांबणीवर

Published On: Jan 28 2018 1:38AM | Last Updated: Jan 27 2018 11:32PMपिंपरी : प्रतिनिधी

समाविष्ट गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 425 कोटी रुपयांमध्ये 90 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून खुद्द मुख्यमंत्र्यांनी शनिवारी (दि.27)  खासदार, दोन्ही आमदार,  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेते आणि आयुक्तांना बैठकीसाठी पाचारण केले होते. शहराचे व विविध राजकीय पक्षांचे या बैठकीकडे लक्ष लागलेले असतानाच ही बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याचे समजते. 

परदर्शकतेचा नारा देत भाजपा सत्ताधार्‍यांनी पालिकेचा कारभार सुरू केला होता; मात्र समाविष्ट गावांसाठी 425 कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.  हे काम ठराविक ठेकेदारांनाच  मिळावे म्हणून काही पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना हाताशी धरून ‘रिंग’ केल्याचा आरोप करत 425 कोटींच्या कामात 90 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन केला.  त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर इतर पदाधिकार्‍यांनीही भाजपावर शिरसंधान साधले.

विरोधकांबरोबरच खासदार अमर साबळे यांनी पालिकेत चाललेल्या भ्रष्ट कारभाराबाबत लक्ष द्या, अशी विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून या कामाचा अहवाल मागविण्यात आला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे यांनी पक्षाचा खासदार असूनही, पक्षाची बदनामी करत असल्याचा आरोप करत, हे फक्त मुलीला पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी या दृष्टीने केले असल्याचे म्हणत, खासदार साबळे यांना पोटशूळ उठला आहे, अशी खरमरीत टीका केली. त्यामुळे सावळे यांच्या विरोधात साबळे समर्थक गुरुवारी (दि.25) एकवटले. 

ज्यांना भाजपाच्या आचार, विचाराची जाण नाही त्यांनी खासदारावर टीका करू नये, असे म्हणत सावळे यांचा निषेध केला आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेशस्तरावर करण्यात आली.

त्याअनुषंगाने शनिवारी (दि.27) मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांनी खा. अमर साबळे, आ. लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाचारण केले होते. 425 कोटींच्या कामात 90 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपांतर्गत जोरदार राजकारण तापले होते. ‘वर्षा’वरील बैठकीत काय होणार याकडे भाजपाबरोबरच शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाबरोबर पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत आंदोलन करणार्‍या लहान-मोठ्या संघटनांचे लक्ष लागून राहिले होते.

शहराध्यक्ष परदेश वारीवर

नियोजित दौर्‍यानुसार शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे शुक्रवारी (दि. 26) रात्री परदेश वारीला गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्यामुळे ही बैठक पुढे ढकलली असल्याचे पक्षात बोलले जात आहे. याबाबत जगताप गटाशी संपर्क साधला असता मुख्यमंत्री कार्यालयाकडून बैठकीसाठी निरोप आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.