Thu, Jul 18, 2019 17:18होमपेज › Pune › जातीच्या राजकारणात भाजपची कोंडी

जातीच्या राजकारणात भाजपची कोंडी

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 01 2018 10:44PMपिंपरी : संजय शिंदे

भाजपवर  विरोधी  पक्षाकडून  नेहमीच जाती-पातीत वाद लावून फायदा पाहणारा पक्ष म्हणून टीका केली जाते. त्याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुसर्‍या महापौर निवडीमध्ये पाहावयास मिळाला. आपापल्या जातीच्या नगरसेवकांना संधी देण्यासाठी जातीचा आधार घेत भविष्यातील  निवडणुकांची भीती दाखवत पक्षालाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेला. याला वेळीच लगाम घातला नाही तर जाती-पातीमध्ये अराजकता माजून पक्षाला त्याची किंमत मोजावी लागणार या चर्चेला शहरात उत आला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या दुसर्‍या महापौरपदी भोसरीचे आ.महेश लांडगे यांचे समर्थक नगरसेवक राहुल जाधव यांची निवड अंतिम झाली आहे. शनिवारी (दि.4) त्याची औपचारिकता बाकी आहे. तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून नवीन महापौर निवडण्याच्या राजकारणाला गती मिळाली. स्थायी समिती अध्यक्ष , सत्तारूढ पक्षनेते पद हे शहराध्यक्ष आ.लक्ष्मण जगताप गटाचे असल्याने शहर राजकारणाचा समतोल साधण्यासाठी आ. महेश लांडगे यांच्या गटाचा महापौर होणार हे माहित होते; परंतु स्थायीप्रमाणे महापौर पदाबाबत जगताप बाजी मारणार असे वातावरण निर्माण झाल्याने  जाती-पातीच्या राजकारणाला महत्त्व दिले गेले.

महापौरपद हे इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) जाहीर झाले. पहिल्या महापौर पदावरून जगताप आणि  लांडगे यांच्यात स्पर्धा झाली. त्यात लांडगे यांनी बाजी मारत समाविष्ट गावातील कुणबी समाजातील नितीन काळजे यांना महापौरपदावर विराजमान केले. जगताप गटाकडून स्थायी अध्यक्ष पदावर सीमा सावळे यांची वर्णी लावली. सावळे यांचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या आर्थिक चाव्या आपल्या हातात घेण्यासाठी समाविष्ट गावातील राहुल जाधव यांना संधी द्यावी, अशी मागणी आ. लांडगे यांनी पक्षाकडे केली; मात्र जगताप यांनी दुसर्‍यांदा स्थायीवर कोठेही चर्चेत नसणार्‍या ममता गायकवाड यांची वर्णी लावत सर्वानाच धक्का दिला. त्यानंतर लांडगे गटाच्या राहुल जाधव यांनी स्थायी सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एक आठवडा विविध विषय समितीच्या सभापती पदाचे राजीनामे देऊन लांडगे समर्थकांनी दबाव टाकला होता; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

शेवटी जाती-पातीच्या राजकारणाचा डाव खेळला गेला. राहुल जाधव यांना महापौरपदावर विराजमान करण्यासाठी  ‘माळी कार्ड’ चालविण्यात आले. त्याअनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन पक्षालाच इशारा देण्यात आला. जर खर्‍या ओबीसी आणि त्यातील माळी समाजाला संधी दिली नाही तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्याचा विपरीत परिणाम होईल. शहरात दीड लाख माळी मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पाठीमागे  होतो. यावेळी आमचा विचार केला नाही तर भविष्यात आम्हाला बेरजेत धरू नका, असा इशारा दिला होता. 

दुसरीकडे जुने भाजपाई आणि सध्या जगताप समर्थक असणारे नामदेव ढाके यांना महापौरपदी संधी देण्यासाठी खान्देशवासियासह लेवा-पाटीदार समाजाने पत्रकार परिषद घेऊन  पक्षाने ढाके यांनासंधी द्यावी अशी मागणी केली होती. यावरूनच पिंपरी-चिंचवडमधील जातीय समिकरणाला वेळीच आवर घातला नाही तर येऊ घातलेल्या निवडणुकात निश्चितच त्याचा विपरीत परिणाम होणार असून त्याचा अप्रत्यक्षरित्या  विरोधी पक्षांना फायदा होणार असल्याचे कोणा जोतिष्याला विचारण्याची गरज नाही.

मुख्यमंत्र्यांची पाठराखण लांडगेंच्या पथ्यावर...

मराठा आरक्षणावरून राज्यातील मराठा समाजाकडून मुख्यमंत्री हटाववर जोर दिला आहे. त्याबाबत पक्षाला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांनी फडणवीस यांची पाठराखण केली आहे. त्यानुसार आ. लांडगे यांनीही मुख्यमंत्री हटविले तर मी पाठिंबा काढून घेणार, असा इशारा एका दैनिकाच्या वेबपोर्टलवर दिला होता. आ.लांडगे यांच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर जोरदार हल्ला चढविण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकेवरून ‘यू टर्न’ घेत आरक्षणासाठी प्रयत्न करणार असून हेच सरकार आरक्षण देईल असा विश्वास व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांची पाठराखण महापौर पदाबाबत आ. लांडगेच्या पथ्यावर पडल्याची चर्चा शहरात आहे.