Mon, Jul 06, 2020 10:48होमपेज › Pune › मेगाभरतीच्या नादात पूरग्रस्तांना विसरला का? : थोरात  

मेगाभरतीच्या नादात पूरग्रस्तांना विसरला का? : थोरात  

Last Updated: Oct 09 2019 8:24PM
पुणे : प्रतिनिधी

आभासी आकड्यांचा खेळ करत भाजप आभासी दुनियेत वावरत आहे. मात्र काँग्रेस आभासी दुनियेत जगत नाही. या निवडणूकीत महाआघाडीला 160 जगापर्यंत यश मिळेल. आम्ही सत्ता स्थापन करू असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तसेच नुसताच घोषणांचा मारा करणाऱ्यांनी पुणे स्मार्ट केले का असा टोला ही थोरात यांनी लगावला. ते आज (दि.९) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

थोरात म्हणाले, शहरात वाहतूक, पाणी, रस्ते, कचरा, अस्वच्छता आदी प्रश्न गंभीर होत चालले आहेत. पाच वर्षात भाजपने शहराची दुरवस्था केली. त्यामुळे या निवडणुकीत दिल्लीतील नेत्यांच्या भावनिक आव्हानांना शहरासह राज्यातील जनता फसणार नाही. या निवडणुकीत कलम ३७० वर आम्ही चर्चा करणार नाही तर लोकांच्या जीवनाशी निगडित मुद्द्यावर आमचा भर असणार आहे. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात की आम्ही ओबीसीसाठी खूप काम केले मात्र काय काम केले याचे स्पष्टीकरण देत नाही. याउलट २००८ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना ओबीसींना आरक्षण मिळाले होते. या सरकारने धनगर समाजाचा केवळ राजकरणासाठी वापर केला. त्यांना नुसती आश्वासने दिली. भाजपाकडून मिळणाऱ्या वागणुकीवर जानकर नाराज आहेत, मात्र त्यांना सत्तेची चटक लागली असल्याची टोला थोरात यांनी लगावला. 

उद्धव ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका...

आज संगमनेर येथील प्रचार सभेत बोलताना थोरात यांनी घरी बसावे अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला उत्तर देताना थोरात म्हणाले, सभेला आल्यानंतर नेत्यांना काही तरी बोलावे लागते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य फार गांभीर्याने घेऊ नका असा चिमटा यांनी काढला.

दोन महिन्यात पूरग्रस्तांसाठी सरकारने काय केलं?

महापुराचा फटका कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याला बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकांची घरे गेली, शेतीचे नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीतून लोकांना सावरण्यासाठी सरकारने काय केले? पूरग्रस्तांना व्यवस्था काय केली? निवडणुकीच्या धामधुमीत आणि मेगाभरतीच्या नादात पूरग्रस्तांना विसरले की काय? असे प्रश्न थोरात यांनी उपस्थित केली.

या पत्रकार परिषदेवेळी पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार शरद रणपिसे, प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. रोहित टिळक, अभय छाजेड, जेष्ठ नेते उल्हास पवार, कमळ व्यवहारे, आबा बागुल आदी उपस्थित होते.