होमपेज › Pune › भाजपमध्ये चढाओढ; काँग्रेसमध्ये शोधाशोध

भाजपमध्ये चढाओढ; काँग्रेसमध्ये शोधाशोध

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:54AMआगामी लोकसभेच्या निवडणुका पुढील सहा-आठ महिन्यांत जाहीर होतील. या निवडणुकींसाठीची लगबगही सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या महिन्यात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले हल्लाबोल आंदोलन, काँग्रेस व भाजपने केलेली उपोषण यामुळे इच्छुक आणि कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत.

लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने भाजप विरुध्द काँग्रेस असाच सामना रंगणार आहे. मात्र, पुण्याच्या जागेवर दावा सांगत राष्ट्रवादीने त्यात उडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे आघाडीत पुण्याच्या जागेचा तिढा कसा सोडविणार याबाबत उत्सुकता आहे. त्यासंबंधीचे चित्र प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल. सद्य:स्थितीला ही जागा काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसला कोणाला मैदानात उतरविणार हा प्रश्‍न आहे. त्याला आता कारणही तसेच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून युवक प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी निवडणूक लढविली होती, त्यावेळेस काँग्रेसकडून तत्कालीन आमदार विनायक निम्हण, माजी आमदार मोहन जोशी हे प्रमुख इच्छुक होते.

मात्र, तरुण चेहरा म्हणून काँग्रेसने कदम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. मोदी लाटेत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता लोकसभा निवडणुकीला पुन्हा सामोरे जाताना कदम यांच्याकडेच संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात होते, त्यादृष्टीने गेले चार वर्षे ते पुण्याच्या राजकारणात सक्रियही होते, मात्र, लोकसभेच्या तोंडावरच विश्‍वजित यांचे वडील माजी मंत्री व विद्यमान आमदार पतंगराव कदम यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून त्याठिकाणी काँग्रेसने विश्‍वजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विश्‍वजित सांगलीकडे परतल्याने पुण्यातील काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार कोण असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

सद्य:स्थितीला माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे यांची नावे पक्षापुढे आहेत, मात्र, राहुल गांधी यांच्या नव्या टीममध्ये सध्या तरुण चेहर्‍यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे विश्‍वजित यांच्यासारखा तरुण आणि तेवढाच मनी आणि मसल पॉवर असलेला चेहरा काँग्रेसकडे सद्य:स्थितीला तरी नाही. त्यामुळे काँग्रेसला मातब्बर उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. तरच काँग्रेसला पुण्याची जागा भाजपकडून परत आणता येणे शक्य होईल.

काँग्रेसच्या उलट अवस्था भाजपमध्ये आहे. या पक्षात इच्छुकांची मांदियाळी आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळे हे पुन्हा जोमाने तयारीला लागले आहेत. पक्ष पुन्हा संधी देईल याची त्यांना खात्री आहे. याशिवाय पालकमंत्री गिरीश बापट हेही दिल्लीत जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी जाहीरपणे त्यांचे पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. पक्षासाठी उमेदवारीचा एक पर्याय म्हणून ते असणार आहेत. शिरोळे-बापट या स्पर्धकांमध्ये आता राज्यसभा खासदार संजय काकडे यांनीही उडी घेतली आहे. आपण लोकसभेसाठी इच्छुक असून, पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवू असे त्यांनी जाहीर केले आहे. याशिवाय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी नवीन चेहरा म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या व्यतिरिक्त भाजपचे शहरात आठ आमदार असून, त्यांचाही पर्याय भाजपला उमेदवार म्हणून उपलब्ध असणार आहे.

राष्ट्रवादीने पुण्याची जागा लढविल्यास त्यांचा उमेदवार कोण? असाही प्रश्‍नही आहे. मात्र, राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात उतरली तरी राष्ट्रवादीचा उमेदवार हा अनपेक्षित चेहरा असेल अशी चर्चा आहे, तर दुसरीकडे युती करणार नसल्याचे ठणकावून सांगणार्‍या सेनेला पुण्यात उमेदवारासाठी शोधशोध करावी लागणार आहे. सद्य:स्थितीला आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, माजीमंत्री शशिकांत सुतार, डॉ. अमोल कोल्हे अशा काही नावांचा सेनेकडे पर्याय असेल. एकंदरीतच लोकसभेची निवडणूक जवळ येत असतानाच राजकीय पक्षांना उमेदवार निवडीचा प्रश्‍न अधिक सतावणारा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणूकींची चाहूल आता लागली आहे. सत्ताधारी भाजपमध्ये विद्यमान खासदार जोमाने कामाला लागले असतानाच पक्षातील आणखी एका खासदाराने निवडणूकीचे रण फुंकले आहे. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारी चढाओढ लागली आहे, याउलट परिस्थिती काँग्रेसमध्ये असून संभाव्य उमेदवार निवडणूकीच्या रिंगणातून बाहेर पडल्याने काँग्रेसला आता उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागणार आहे.

पांडुरंग सांडभोर