Wed, Jun 26, 2019 23:29होमपेज › Pune › शरद पवारांसाठी धक्‍कादायक निकाल; 'माळेगाव बुद्रुक'वर भाजपची सत्ता!

शरद पवारांसाठी धक्‍कादायक निकाल!

Published On: Jan 23 2018 1:33AM | Last Updated: Jan 23 2018 11:38AMमाळेगाव : वार्ताहर

बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीवर अखेर भाजपने आपला झेंडा फडकविला. सोमवारी (दि. 22) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत जयदीप विलास तावरे यांनी एका मताने बाजी मारत सरपंचपदाची खुर्ची पटकावली. तावरे यांना 9, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र चव्हाण यांना 8 मते मिळाली. सरपंचपदाच्या निवडीमुळे गेला महिनाभर चाललेली राजकीय उलथापालथ सोमवारी थांबली. हा निकाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी धक्‍कादायक मानला जातो.

माळेगावचे यापूर्वीचे सरपंच जयदीप दिलीप तावरे यांनी ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करण्याच्या उद्देशाने 12 सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले होते. जयदीप दिलीप तावरे यांना कोणत्याही परिस्थितीत खुर्चीवरून हटविण्याचा चंगच काही सदस्यांनी बांधला होता. त्यातून माळेगावच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला होता. या सगळ्या घडामोडीत सरपंचपद भाजपकडे जात असल्याची चाहूल राष्ट्रवादीला लागल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याप्रश्‍नी लक्ष घालत जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोकराव तावरे यांचे मनोमिलन घडवून आणले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही ग्रामपंचायत जाणार नाही, अशी चिन्हे दिसत होती.