Thu, Apr 25, 2019 06:19होमपेज › Pune › निगडीपर्यंत ‘मेट्रो’ला भाजप पदाधिकार्‍यांचा पाठिंबा

निगडीपर्यंत ‘मेट्रो’ला भाजप पदाधिकार्‍यांचा पाठिंबा

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 10:59PMपिंपरी : प्रतिनिधी

पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांनी केलेल्या उपोषण आंदोलनास भाजपच्या आमदारासह पदाधिकारी व नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम संपल्यानंतरच दुसर्‍या टप्प्यात निगडीपर्यंतचे काम हाती घेतले जाईल, असे दोन वेळा जाहीर व्यासपीठावर स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या विधानाशी सहमत नसून, त्यांचे विधान गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र शहरात उमटले आहे. 

दापोडी ते पिंपरीपर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. वल्लभनगर स्थानकाचे कामही सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातच पिंपरीच्या पुढे निगडीच्या भक्ती-शक्तीसमूह शिल्प चौकापर्यंत मेट्रोची शहरवासीयांची मागणी आहे. त्याच दृष्टीने पालिकेने महामेट्रो रेल कॉर्पोरेशनला पिंपरी ते निगडीचा डीपीआर बनविण्यास सांगितले आहे. त्याचा खर्च पालिका देणार आहे. डीपीआर बनविण्याचे काम सुरू असून, तो चार महिन्यांत तयार होईल, असे मेट्रोच्या अधिकार्‍यांचे मत आहे. 

मात्र, प्रथम पिंपरी ते स्वारगेट मेट्रो सुरू होऊ द्या, त्यानंतर कात्रज ते निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम दुसर्‍या टप्प्यात केले जाईल, असे पालकमंत्री बापट यांनी भोसरीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विधान केले होते. त्याचा पुनर्उच्चार त्यांनी वल्लभनगर स्थानकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात केला. त्यामुळे शहरवासीयांमध्ये नाराजी वाढली आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सामजिक संस्था व संघटनांनी एकत्रित येऊन निगडीपर्यंत मेट्रो सुरू करण्यासाठी पिंपरी चौकात रविवारी  उपोषण केले. 

उपोषणाला भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे आणि अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिला. निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी मंत्रालय व विधानसभेत पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले, तर पिंपरीपर्यंतच्या कामासोबतच निगडीपर्यंतचे कामही केले जाईल. त्यासाठी डीपीआर तयार होण्याची वाट पाहिली जात आहे, असे सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी सांगितले.

भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेेट्रो नेण्यात येईल, असे विश्‍वासपूर्वक सांगत आहेत. मात्र, पालकमंत्र्यांनी निगडीपर्यंत मेट्रोला ‘रेड सिग्नल’ दिलेला असताना भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी त्याच्या विरुद्ध भूमिका मांडत निगडीपर्यंत मेट्रो होणारच, असे सांगत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर पालकमंत्र्यांचे वक्तत्व गांभीर्याने घेतले जात नसल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे.