Mon, Apr 22, 2019 03:46होमपेज › Pune › निष्ठावंतांच्या भाजपला ‘राजधानीत’ गटबाजीचे ग्रहण 

निष्ठावंतांच्या भाजपला ‘राजधानीत’ गटबाजीचे ग्रहण 

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 10:49PMवडगाव मावळ : गणेश विनोदे

वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील ‘पॅटर्न‘ वापरला गेल्याने पुन्हा एकदा भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असल्याने एरवी निष्ठावंतांचा पक्ष समजल्या जाणार्‍या भाजपला आता तालुक्याची राजधानी वडगावात गटबाजीचे ग्रहण लागल्याचे दिसून येते.

नगर पंचायत निवडणुकीपूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडीत उदयास आलेल्या श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडी व वडगाव-कातवी नगरविकास आघाडी या दोन पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आणि भाजपच्या अपेक्षा पूर्ण होवून विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.परंतु काँग्रेसला रामराम ठोकलेल्या पंढरीनाथ ढोरे यांना पक्षात खेचण्यात यशस्वी झालेल्या भाजपने ढोरे यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीपर्यंत नेवून अचानक डावलले. ही चूक भाजपला महागात पडली आणि ढोरे यांच्यासह भाजपची अधिकृत उमेदवारी मिळालेले ढोेरे समर्थक चार उमेदवार पोटोबा महाराज आघाडीत सहभागी झाले.

याचा फटका भाजपला बसला आणि पक्षाचे अधिकृत 13 व प्रभाग क्र.2 मधील अपक्ष उमेदवाराला बरोबर घेऊन 14 जागा लढविण्याची नामुष्की भाजपवर आली. दरम्यान, शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील पक्षाच्या विजयाचे शिलेदार मानले जाणार्‍या भास्करराव म्हाळसकर यांना भाजपने उमेदवारी दिली;  परंतु यामुळे नाराज झालेल्या काहीं मंडळींनी डावपेचांना सुरुवात केली.

बंडखोरांना थोपविण्यात कायम यशस्वी होणार्‍या भाजपमध्ये माजी उपसभापती प्रवीण चव्हाण यांच्यासह राजेंद्र ढोरे, दीपक कुडे यांनी बंडाचे निशाण फडकावले. यामध्ये प्रवीण चव्हाण हे प्रभाग क्र. 8 मधून विजयीही झाले. तर या बंडखोरीमध्ये माजी सरपंच नितीन कुडे व संभाजी म्हाळसकर यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

याशिवाय, भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळख असलेल्या काही प्रभागांमध्ये पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाहीत. एकंदर बंडखोरी आणि डावपेचांमुळे भाजपला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या पत्नी सायली म्हाळसकर या प्रभाग क्र.16 मधून विजयी झाल्या असून, तालुक्यात पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून मनसेने एंट्री केली आहे. राष्ट्रवादी व भाजपने बंडखोरांना बरोबर घेऊन सत्तेचे गणित आखण्याचा प्रयत्न केला तरी 8-8 असे समान संख्याबळ होत असल्याने मनसेवरच सत्तेचे गणित ठरणार आहे. तसेच, कोणत्याही दोन आघाड्या एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला तरी नगरपंचायतीमध्ये एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार असून सत्ताधार्‍यांना अखेरपर्यंत मनसेची एन्ट्री डोकेदुखी ठरणार आहे.     

तो ‘पॅटर्न‘च ठरला कारणीभूत : रामनाथ वारिंगे

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या डावपेचांमुळेच पराभव पत्करावा लागला असल्याची ‘री‘ ओढत आताही याच डावपेचांमुळे पक्षाचे उमेदवार भास्करराव म्हाळसकर यांच्यासह पंढरीनाथ ढोरे यांना पराभव पत्करावा लागला असून याच डावपेचांचा फायदा मयूर ढोरे यांना होऊन ते या तिरंगी लढतीमध्ये विजयी झाले. त्यामुळे तो ‘पॅटर्न‘ पक्षासाठी घातक ठरत असून यातूनच भाजपला गटबाजीचे ग्रहण लागल्याचा आरोप रामनाथ वारिंगे यांनी ‘पुढारी’शी बोलताना केला.

राष्ट्रवादी प्रबळ; पण सत्तेसाठी गटबाजीची अडचण     

दरम्यान, गणेशआप्पा ढोरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या एका गटाने श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडी करुन राष्ट्रवादीचे 9, अपक्ष 2 व भाजपची उमेदवारी मिळालेले पंढरीनाथ ढोरे समर्थक 3 अशा 14 जागा लढविल्या. यापैकी 6 जागांवर विजय मिळवला असून, बाबूराव वायकर यांच्या नेतृत्वाखालील दुसर्‍या गटाने वडगाव-कातवी नगरविकास आघाडी करुन राष्ट्रवादीचे 5, अपक्ष 2 व शिवसेनेचे 4 अशा 11 जागा लढवून 4 जागांवर विजय मिळवला. दोन्ही गटाच्या मिळून 10 जागांचे संख्याबळ झाले आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी प्रबळ पक्ष ठरला असल्याचे दिसते; मात्र हे दोन्ही गट एकत्र येणे अशक्य असल्याने पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.