Tue, May 21, 2019 12:38होमपेज › Pune › बारामतीत भाजप पदाधिकारी-सरकारी अधिकार्‍यांत बाचाबाची

बारामतीत भाजप पदाधिकारी-सरकारी अधिकार्‍यांत वाद

Published On: May 12 2018 2:20PM | Last Updated: May 12 2018 2:20PMबारामती : प्रतिनिधी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बारामती विमानतळावर जमलेल्या भाजप पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. भाजप पदाधिकार्‍यांनी प्रांताधिकार्‍यांच्या निषेधाच्याही घोषणा दिल्या. पोलिस प्रशासनाबरोबरही जोरदार खटके उडाले. शनिवारी (दि. १२) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. अखेर जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी विमानतळावरील विश्रामकक्षातून बाहेर येत पदाधिकार्‍यांची समजूत घातली. 

नातेपुते (ता. माळशिरस) येथील एका विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री बारामती विमानतळावर शनिवारी पावणे बाराच्या सुमारास दाखल झाले. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी तासभर भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते व प्रशासनाची जोरदार बाचाबाची झाली. मुख्यमंत्र्यांसोबत विवाह सोहळ्याला जाण्यासाठी प्रा. राम शिंदे हे मोटारीतून बारामती विमानतळावर आले होते. भाजपचे अनेक बडे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला हजर होते. परंतु, त्यांना विमानतळावर सोडण्यात आले नाही. पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून रोखल्याने सत्तेत असलेल्या भाजप पदाधिकार्‍यांचा पारा चढला. 

बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यानी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जाणार्‍यांची चुकीची यादी पोलिस प्रशासनाला दिल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. प्रांताधिकारी हाय हाय, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. मंत्री प्रा. शिंदे यांनी बाहेर येत कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर पावणे बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे विमान दाखल झाले. विश्रामकक्षात काही प्रमुख पदाधिकार्‍यांचे सत्कार स्वीकारत मुख्यमंत्री व प्रा. शिंदे हे एकाच मोटारीतून नातेपुतेकडे रवाना झाले.

Tags : pune, baramati, BJP, CM, devendra fadanvis, ram shinde