Sun, Jul 21, 2019 00:22होमपेज › Pune › राजकीय व्यक्तींना संधीचे भाजपकडून उदात्तीकरण

राजकीय व्यक्तींना संधीचे भाजपकडून उदात्तीकरण

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 28 2018 1:24AMपिंपरी :  नंदकुमार सातुर्डेकर 

पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर वर्षभराने क्षेत्रीय कार्यालय निवडणूक  झाली.  आठ प्रभाग समितींवर प्रत्येकी तीन अशा 24 जणांची  नियुक्ती झाली; मात्र निवड करताना  स्वीकृत सदस्यपदी नियुक्त होणारा प्रतिनिधी राजकीय पक्षाचा नसावा या नियमास बगल देऊन भाजपने आपल्याच कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केले आहे, वर  ’याआधी अन्याय झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना, मित्रपक्ष ‘आरपीआय’ ला या निवडीत न्याय दिला’ अशा प्रेसनोट वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी पाठवून भाजपने या राजकीय नियुक्त्यांचे, आपल्या कृतीचे जणू समर्थनच केले आहे 

महापालिकेच्या राजकारणात प्रभाग समित्यांना महत्वपूर्ण स्थान असल्याने, तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्‍नांना या ठिकाणी न्याय देणे शक्य असल्याने राजकीयदृष्ट्याही त्यांचे महत्व वाढले आहे. पालिका अधिनियमातील तरतुदी अंतर्गत प्रभाग समितीमध्ये बिनसरकारी आणि सामाजिक संघटनांचे म्हणजेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नियुक्त करण्याची तरतूद आहे.  स्वीकृत सदस्यपदी नियुक्त होणारा प्रतिनिधी कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसावा, अशी अट आहे.  पण याआधी पालिकेत सत्तेत असणार्‍या राष्ट्रवादीने आपल्याच कार्यकर्त्यांना संधी दिली, अन आता सत्ताधारी भाजपने त्यांचेच अनुकरण केले. 

क्षेत्रीय कार्यालयावर स्वीकृत सदस्यपदांसाठी निवडणूक झाल्यानंतर भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी तीन प्रेस नोट वृत्तपत्रांना पाठविल्या भाजपची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांची जाहीर यादी या शीर्षकाखाली थोरातांनी वृत्तपत्रांना पहिली प्रेस  नोट पाठवली.  त्यापाठोपाठ आठही प्रभाग समित्यांवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडताना भाजपच्याच कार्यकर्त्याला संधी मिळणार हे उघड सत्य होते. तरीसुध्दा मित्रपक्ष म्हणून रिपाई ला भाजपने संधी दिल्याची दुसरी प्रेस नोट अन आ. लक्ष्मण जगताप क्षेत्रीय कार्यालयावर निवडीबद्दल कार्यकर्त्यांचा सत्कार करतानाचा फोटो वृत्तपत्रांना पाठविण्यात आला.   

भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे हे या मार्केटिंगच्या स्पर्धेत मागे कसे राहतील? त्यांनीही आपल्या कार्यालयामार्फत स्वतःची पाठ थोपटून घेणार्‍या प्रेस नोटचा मारा केला ’भोसरी मतदार संघात आमदार लांडगेंचे निर्विवाद वर्चस्व; प्रभाग समितीवर दिली अन्याय झालेल्यांना संधी ’अशी प्रेस नोट आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयाकडून वृत्तपत्रांना पाठवली गेली. 

क्षेत्रीय कार्यालय स्वीकृत सदस्य निवड करताना स्वयंसेवी संस्थांच्या खर्‍या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याऐवजी स्वयंसेवी संस्थेच्या लेबलवर भाजपच्या कार्यकर्त्यांचीच वर्णी लागली आहे हे या निवडीनंतर भाजपचे झेंडे घेऊन काढण्यात आलेल्या मिरवणुकांमुळे सिद्ध झाले.  पण अन्याय झालेले याविरोधात आवाज कसा उठविणार? 

न्यायालयात जाणार ?

भाजप कार्यकर्ता हा शिक्का कपाळावर असला तरी स्वयंसेवी संस्थांचे पत्र ,ऑडिट रिपोर्ट हे सोपस्कार पूर्ण करून कायद्यात बसण्याचा प्रयत्न अनेकांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज सादर करतानाच केला आहे त्यांनी कायद्यातून अशी पळवाट शोधली असल्याने न्यायालयात गेलो तर केस टिकेल का ? या संभ्रमावस्थेत अनेकजण आहेत.