होमपेज › Pune › भाजप-सेनेतील संघर्ष वाढणार?

भाजप-सेनेतील संघर्ष वाढणार?

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 1:05AM

बुकमार्क करा

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेत्यांच्या  कार्यालयातील संगणक प्रशासनाने उचलून नेल्याच्या प्रकारामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप - सेनेतील संघर्ष  वाढण्याची चिन्हे आहेत. 

पालिकेच्या तिसर्‍या मजल्यावर शिवसेना गटनेते  कलाटे यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील संगणक आदी पालिकेची यंत्रणा वापरून माजी नगरसेवक मारुती भापकर  हे सत्ताधारी भाजपविरोधात पत्रकबाजी करतात, असा भाजपचा आक्षेप आहे. यामुळेच हा संगणक पालिकेने उचलून नेल्याची चर्चा आहे. गटनेत्यांच्या अनुपस्थितीत संगणकाचा बाहेरच्या व्यक्तीकडून गैरवापर होत असल्याची तक्रार स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केल्याने हा संगणक काढून घेतला आहे. गटनेते आल्यावर संगणक सुविधा पुन्हा दिली जाईल असे सांगितले. त्यामुळे भापकरांची पत्रकबाजी हेच संगणक हटावचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गटनेत्यांच्या कार्यालयातून जनहिताची एखादी प्रेसनोट काढली तर बिघडले कुठे? असा सवाल भापकर यांनी केला आहे. आयुक्त हर्डीकर हे स्थायी समिती अध्यक्षा सावळे यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोपही  त्यांनी केला आहे. एकूणच या प्रकारामुळे पालिकेतील शिवसेना, भाजपचे संबंध  ताणले गेले आहेत. 

पालिका निवडणुकीत  भाजपने सेनेला युतीची आशा दाखवत जागावाटपाची चर्चा रेंगाळत ठेवली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर सेनेची एकच धावपळ झाली. अनेक प्रभागात शिवसेनेला उमेदवार मिळाले नाहीत. भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले तर सेनेला फक्त 9 जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर सेनेला नामोहरम करण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. स्मार्ट सिटीवर परस्पर प्रमोद कुटे यांची नियुक्ती करून शिवसेनेत भांडण लावून दिले.गटनेते कलाटे यांना याविरोधात न्यायालयात धाव घ्यावी लागली. 

यानंतर कलाटे यांच्या प्रभागातील बीआरटी ऐवजी वाकड येथील रस्ता करण्याचा ऐनवेळचा विषय दाखल करून घेण्यास नकार देऊन विधि समिती सभापतींनी वादास तोंड फोडले. पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे त्यांनी बोट दाखवल्याने कलाटे यांनी पक्षनेत्यांना सेनेच्या भाषेत चांगलेच सुनावले होते. आता शिवसेना गटनेत्यांच्या कार्यालयातील संगणक हटविण्याच्या प्रकारामुळे भाजप -सेना संबंध अधिक ताणले जाणार आहेत. 

पालिका सभेत उमटणार पडसाद
शिवसेना गटनेते राहुल कलाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे  पालिकेत येत नाहीत. माजी गटनेत्या सुलभा उबाळे चिरंजीवाच्या विवाह सोहळ्याच्या तयारीत मग्न आहेत. त्यामुळे भाजप विरोधात सेनेत लगेच तीव्र प्रतिक्रिया उमटली नसली तरी  पालिका सभागृहात सेनेचे नगरसेवक आवाज उठविणार असल्याचे समजते.