Fri, May 24, 2019 02:59होमपेज › Pune › भाजपाला सीमावासीयांचे सोयरसुतक नाही 

भाजपाला सीमावासीयांचे सोयरसुतक नाही 

Published On: Jan 25 2018 1:18AM | Last Updated: Jan 25 2018 12:42AMपिंपरी :

भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील कर्नाटकमध्ये जातात आणि कानडीचे गोडवे गात आहेत.  भाजपावाल्यांना मराठी माणसाचे, सीमा प्रश्नांचे काही घेणे-देणे नाही.  सीमा प्रश्नांसाठी शिवसेनेने रक्त सांडले आहे. सत्तेवर बसलेले सरकार मराठी माणसाच्या हिताचे नाही. त्यामुळे हे राज्य घालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी असून, भाजपा हिंदुत्ववादी आहे की नाही हे तपासावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.  

शहरातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका संजय राऊत यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.24) झाल्या.  त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख योगेश बाबर, गटनेते राहुल कलाटे, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस यांचे सरकार असून देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नसल्यामुळे निराशा आहे. सत्तेत राहून देखील जनतेचे हित पाहून सरकारच्या विरोधात बोलण्याची शिवसेनेत हिंमत आहे. सत्तेची आम्हाला फिकीर नाही. आगामी निवडणुकीचे आम्ही रणशिंग फुंकले आहे. आमचा पहिला विरोधक भाजपा असणार आहे.  

भाजपासोबत 25 वर्षे युती होती. भाजपाने 2014 मध्ये स्वत:हून युती तोडली आहे,  आम्ही तोडली नाही. केवळ महाराष्ट्र अस्थिर होऊ नये म्हणून शिवसेना सत्तेत आहे. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी गुन्हे दाखल असलेले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक केली जात नाही, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भिडे आणि एकबोटे दोघेही हिंदुत्ववादी आहेत. सरकार देखील हिंदुत्ववादी आहे. त्यांचीही काहीतरी जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पक्षाचे कोणत्या चुकांमुळे नुकसान झाले आहे, ते आता लक्षात आले आहे. त्या चुका मान्य करून त्यामध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

खा.संजय काकडेंचा मेंदू तपासून घ्या 

भाजपाचे सहयोगी खा. काकडे यांनी मेंदू तपासून घ्यावा. पुण्यात चांगले रुग्णालय असून, तेथे त्यांना पाठवावे. भाजपाचे नुकसान होऊ नये, या भीतीने ते बोलत असतील, अशी टीका राऊत यांनी केली. शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय अतिशय घाईत घेतला असून, त्यामुळे शिवसेनेची वाईट अवस्था होईल, असे मत खासदार काकडे यांनी व्यक्त केले होते.