Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Pune ›  भाजप नगरसेविकेने लावल्या तब्बल अकरा पाट्या 

नगरसेविकेच्या घरासाठी ‘दाही दिशा’ खुल्या

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 1:30AMहिरा सरवदे

पुणे ः नगरसेवकांच्या निवास्थानांचे रस्ते दर्शवणार्‍या पाट्या क्षेत्रीय कार्यालयांकडून लावल्या जातात. स्वतःच्या घराचा रस्ता दर्शिवणार्‍या किती पाट्या एका नगरसेवकाने लावाव्यात, यासंबंधी पालिकेचे ठोस धोरण नाही. याचा गैरफायदा घेत अनेक नगरसेवक पाट्यांचा वापर‘होकायंत्र’ प्रमाणे करत आहेत. 

महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सिंहगड रस्त्यावरील एका नगरसेविकेने घराचा रस्ता दर्शविण्यासाठी तब्बल अकरा पाट्या विविध रस्त्यांवर लावल्या आहेत. अशा प्रकारे नागरिकांच्या कर रुपातील पैशाचा गैरवापर केल्याने परिसरातील नागरिकांमधीन नाराजी व्यक्त केली जात आहे. 

शहराच्या विविध रस्ते, चौक, पुतळे, उद्याने, ऐतिहासीक वास्तू, नाट्यगृहे, सभागृह, विविध संस्था, लोकप्रतिनीधींची निवास्थाने आदी ठिकाणी मोठ्या आकाराचे नामफलक महापालिकेच्या वतीने लावले जातात. 

याच ठिकाणी पुन्हा त्या-त्या प्रभागातील नगरसेवक आपल्या निधीतून लहान नामफलक (पाट्या) लावतात. त्यात एका प्रभागात चार नगरसेवक असल्याने संपूर्ण शहरात जागो जागी लहान पाट्यांचा सुळसुळाट पहायला मिळतो. पाट्याच्यासंदर्भात पालिकेचे कोणतेही ठोस धोरण नसल्याने नगरसेवकांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. 

सिंहगड रस्त्यावरील भजपच्या नगरसेविका आणि स्थायी समितीच्या सदस्य मंजुशा नागपुरे यांनी आपल्या निवास्थानाचा रस्ता दर्शवणार्‍या तब्बल अकरा पाट्या विविध रस्त्यांवर लावल्या आहेत. वारजे हायवे, आग्नीशामक केंद्र, विश्‍वा मेडिकल चौक, शिवपुष्प पार्क चौक, अभिनव शाळा, वीर तानाजी मित्र मंडळ, गांदले नगर चौक आदी ठिकाणी एक एक असा 7 आणि सारस्वत बँक चौक व संतोष हॉल चौकात प्रत्येकी 2 पाट्या (एक जुनी व एक नवी)अशा एकूण 11 पाट्या लावल्या आहेत. 

याशिवाय जनसंपर्क कार्यालयाचा रस्ता दर्शविणार्‍या पाट्या वेगळ्या आहेत. या पाट्यांच्या माध्यमातून घराकडे जाण्याचा रस्ता दर्शवणारे पाट्यांचे होकायंत्रच तयार केले आहे, की काय असा प्रश्‍न पडतो.