Sat, Mar 23, 2019 02:05होमपेज › Pune › अनधिकृत बांधकामांना भाजपा शहराध्यक्षांचे पाठबळ  

अनधिकृत बांधकामांना भाजपा शहराध्यक्षांचे पाठबळ  

Published On: Jan 15 2018 1:43AM | Last Updated: Jan 15 2018 1:43AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, सांगवी व नवी सांगवी परिसरात अनधिकृत बांधकामांना भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह माजी नगरसेवक शंकर जगताप आणि भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांचे पाठबळ आहे. त्यामुळे या भागांत गेल्या आठ महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने बिनदास्तपणे अनधिकृत बांधकामे उभे राहत आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी अन्यथा महापालिका भवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा आणि वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी रविवारी (दि.14) पत्रकार परिषदेत दिला. 

मोरवाडीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या परिषदेस माजी नगरसेवक अतुल शितोळे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र जगताप म्हणाले की, महापालिकेने सन 2007 ते 2017 या कालावधीत अनधिकृत बांधकाम आणि त्यावर केलेल्या कारवाईची माहिती मागितली होती. महापालिकेने केवळ ऑक्टोबर ते डिंसेबर 2017 या तीन महिन्यांच्या कालावधीतील माहिती दिली आहे. अन्य माहिती देण्यास महापालिका टाळाटाळ करीत असून, या कृतीवरून महापालिका माहिती दडवत आहे, असा आरोप जगताप यांनी केला. या संदर्भात राज्य व केंद्रीय आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या माहितीनुसार अनधिकृत बांधकाम विभाग सन 2015 मध्ये स्थापन झाला. प्रशासनाने केवळ अनधिकृत बांधकामांच्या 24 नोटीसा दिल्या आहेत. त्यावरून या परिसरात अनधिकृत बांधकामे सुरू नसल्याचे महापालिकेचे मत आहे.

जगताप म्हणाले की, वस्तुस्थिती पाहिल्यास पिंपळे गुरव, सांगवी व नवी सांगवी परिसरात गेल्या आठ महिन्यांत भाजपाचे शहराध्यक्ष, नगरसेवक व त्यांचे सहकार्‍यांच्या वरदस्तामुळे अनेक व्यावसायिक बांधकामे राजरोसपणे चालू आहेत. विशेष म्हणजे ग्रीन झोन, पूर रेषा या क्षेत्रात बांधकामांना परवानगी नसाताना देखील या ठिकाणी 4 ते 5 मजली अनधिकृत व्यावसायिक बांधकामे सुरू आहेत. भविष्यात आप्तकालिन स्थिती निर्माण झाल्यास या अनधिकृत बांधकामांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. मात्र, महापालिका भाजपा पदाधिकार्‍यांच्या दबावामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सन 2015 नंतरची अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याचे व संबंधित बांधकामधारकांवर गुन्हे दाखल करण्याचे शासनाचे आदेश असतानाही, या बांधकामांच्या नोंदी संबंधित महापालिका कर संकलन विभागात रितसर करून त्यांच्याकडून मिळकतकर वसुल करून एकप्रकारे अभय देण्याचा प्रकार केला आहे. या संदर्भात महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कळवूनही ते दुर्लक्ष करीत आहेत. सन 2015 नंतरची अनधिकृत बांधकामांना प्रशासनच जबाबदार असून, त्याची राज्य शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

शास्तीकर आकारुन भाजपकडून फसवणूक
शास्तीकर माफ करू असे आश्‍वासन देऊन भाजपाने राज्यासह महापालिकेत सत्ता मिळविली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार शहरातील 600 चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत निवासी बांधकामांना शास्तीकर माफ,  601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या बांधकामांना 50 टक्के आणि 1 हजार 1 चौरस फूट आकारांपुढील निवासी बांधकामांना दुप्पटीने शास्तीकर आकारण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 601 चौरस फुटावरील सर्व बांधकामधारकांना शास्तीकर भरावाच लागत आहे. दरवर्षी शास्तीकररूपी दंड भरला जात असल्याने ही बाब कायदा व घटनेच्या विरोधात आहे, असे मत राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले. भाजपाने आपले आश्‍वासन न पाळता शास्तीकर आकारणी करून जनतेची फसवणुक केली आहे. 31 डिसेंबर 2015 नंतरची बांधकामे नियमितीकरणातही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. या संदर्भात राज्य शासनाने त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

लायकी नसलेल्या माणसांबाबत काय प्रतिक्रिया देणार : आ. जगताप 
माझ्यावर आरोप करणार्‍या माणसाची लायकी काय आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत त्याला स्वत:चे ‘डिपॉझिट’ वाचविता आले नाही. लायकी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या आरोपावर मी प्रतिक्रिया देणे योग्य समजत नाही, असे भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी ‘पुढारी’ला सांगितले. त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.