Wed, Sep 19, 2018 12:28होमपेज › Pune › चारही समित्यांवर भाजपचेच सभापती

चारही समित्यांवर भाजपचेच सभापती

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 10 2018 10:52PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समिती सभापतींची निवडणूक गुरूवारी (दि.10) बिनविरोध झाली. निवडीनंतर सभापतीच्या समर्थकांनी पालिका भवन परिसरात फटाके फोडून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. पालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी कामकाज पाहिले. विधि समिती सभापतीपदी भाजपच्या माधुरी कुलकर्णी, महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदी सीमा चौघुले आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी संजय नेवाळे यांची बिनविरोध निवड झाली. 

विधी, महिला व बाल कल्याण, क्रीडा आणि शहर सुधारणा या चार समित्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात आला. त्यांच्या जागी प्रत्येक समितीसाठी 9 नवीन नगरसेवकांची 20 एप्रिलच्या झालेल्या  सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. पालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेचा एक अशी सदस्यांची विषय समितीत निवड करण्यात आली. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरला नसल्याने सभापतींची निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान, नवनिर्वाचित सभापतींचा महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी सत्कार केला.