Mon, Apr 22, 2019 21:42होमपेज › Pune › खुद्द भाजपचा पुणेरी पगडीला फाटा 

खुद्द भाजपचा पुणेरी पगडीला फाटा 

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:02AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी- चिंचवडच्या महापौर निवडणुकीसाठी शनिवारी राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करून, फुले पगडी घालून महासभेत आले. तर, त्यांच्या पत्नीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला होता. वेगळा वेश परिधान करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले खरे; पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढे पुणेरी पगडीऐवजी फुले पगडीचा वापर करा, असं वक्तव्य करणार्‍या शरद पवार  यांच्या विचारांची खुद्द भाजपने पाठराखण केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.   

पुणे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पारंपरिक पुणेरी पगडी. मात्र शरद पवार यांनी पगडीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद रंगला.  राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर यापुढे पुणेरी पगडीने कोणाचेही स्वागत करू नका, स्वागत करायचेच असेल तर महात्मा फुले यांच्या फुले पगडीने स्वागत करा असा आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिला. पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शरद पवारांनी छगन भुजबळ यांना फुले पगडी घातली. त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हा सूचनावजा आदेशच दिला.   पुणेरी पगडीचा तिटकारा शरद पवारांना का याची चर्चा झाली.   मात्र काही दिवसांतच पवार यांनी यु टर्न घेतला. 

पगडीबाबतच्या माझ्या वक्तव्यावरून अनेक मंडळी रागावली आहेत; पण कुणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोणत्याही एका वर्गाच्या विरोधात मला बोलायचं नव्हतं, असं पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर हा वाद शमला.   ही फुले पगडी पुन्हा चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे.  भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी- चिंचवड महापालिकेत काल, शनिवारी महापौर निवडणुकीसाठी राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करून फुले पगडी घालून महासभेत आले.

यांचा वेश परिधान केला होता. वेगळा वेश परिधान करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महापौरपदी निवड झाल्यावर त्यांनी नगरसेवकांचे आभार मानले. त्यावेळी त्यांच्या समवेत फोटोचा मोह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाही आवरला नाही . महापौरपदासाठी माळी समाजाचे कार्ड चालवत महापौरपदी विराजमान होत असताना महात्मा फुले यांचा वेश परिधान करणे राहुल जाधव यांच्या दृष्टीने ठीक असले तरी पुणेरी पगडीला फाटा देऊन भाजपने शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण केल्याची चर्चा मात्र महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली आहे. 

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की,  शरद पवार यांनी  यापुढे महात्मा फुले पगडीने स्वागत करा, असे म्हटले होते.  महापौर  राहुल जाधव यांनी  पवार यांचा हा पुरोगामी विचार स्वीकारला ही आनंदाची गोष्ट आहे.