Fri, Apr 26, 2019 19:50होमपेज › Pune › भाजप नाराजांचे बेमुदत उपोषण ‘औटघटकेचे’

भाजप नाराजांचे बेमुदत उपोषण ‘औटघटकेचे’

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 28 2018 1:27AMपिंपरी ः  

क्षेत्रीय सदस्य निवडीत डावललेल्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या (निष्ठावंत) पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार फोनवरून मिळालेल्या आश्‍वासनानंतर मागे घेतले. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा निरोप संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषण मागे घेण्याचा निर्णय झाला. प्रदेशावरून आश्‍वासन खरे ठरणार का पुन्हा फक्त आश्‍वासनांची पाने उपोषणकर्त्यांच्या तोंडाला फासली जातात की हे उपोषण औटघटकेचे ठरणार अशी चर्चा शहरात आहे.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरूवारी (दि. 26) सकाळी 9 वाजल्यापासून क्षेत्रीय सदस्य पदात डावललेल्या भूमिकेतून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. शहर भाजपमध्ये पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व प्राप्त झाले आल्याची सल हे कार्यकर्ते बोलून दाखवत होते. . दरम्यान गुरूवारी दुपारी साडे चार नंतर शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली. या वेळी प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, संघटन सरचिटणी प्रमोद निसळ, नगरसेवक विलास मडिगेरी, शीतल शिंदे, माउली थोरात, केशव घोळवे, नामदेव ढाके, मोरेश्‍वर शेडगे, विनायक गायकवाड आदी उपस्थित होते. आ. जगतापांनी समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करण्यात आल्याने आ. जगताप यांनी काढता पाय घेतला. 

नगरसेवक विलास मडिगेरी आणि माउली थोरात यांनी उपोषणकर्त्यांची बाजू संघटन मंत्री रवी अनासपुरे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दुरध्वनीवरुन सांगितली. उपोषणकर्ते ठोस आश्‍वासनाशिवाय उपोषण मागे घेण्यास तयार नव्हते. रात्री आठनंतर फोनाफोनीला वरील ऊत आला. दरम्यान रवी अनासपुरे यांनी उपोषणकर्त्यांना भेटले. त्यांची बाजू ऐकून घेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबरोबर चर्चा करुन तुमच्यावरील अन्याय दूर करण्यात येईल, त्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला भेटायला बोलवले आहे असे सांगितले. दानवे यांच्या शब्दाचा मान राखत उपोषणकर्त्यांनी गुरुवारी रात्री पावणे दहा वाजता उसाचा रस घेऊन उपोषण मागे घेतले.

उपोषणकर्ते माफी मागणार की..?

उपोषणकत्यार्ंना शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप पक्षाची बाजून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने जगतापांनी काढता पाय घेतला. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी शहराध्यक्ष हटावच्या घोषणा दिल्याचे समजते . त्यावरुन शहराध्यक्षांच्या समर्थकांनी संबंधिताना फोन करुन भाऊंची माफी मागा अन्यथा भाऊ शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत, असा निरोप दिल्याने पक्षात खळबळ माजली.  उपोषणकर्ते माफी मागणार की समर्थकांच्या म्हणण्यानुसार शहराध्यक्षपदाचा राजीनामा  देणार, याकडे पक्षाचे लक्ष लागले आहे.