Sat, Jul 20, 2019 15:17होमपेज › Pune › मांजरी बुद्रुकमध्ये कमळ फुलले

मांजरी बुद्रुकमध्ये कमळ फुलले

Published On: Mar 01 2018 2:01AM | Last Updated: Mar 01 2018 12:32AMहडपसर : वार्ताहर 

मांजरी बुद्रुकमध्ये मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलने राष्ट्रवादी काँगेसचे नेते सुरेश घुले यांच्या 25 वर्षे ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतवरील सत्तेला जबर धक्का दिला आहे. सरपंचपदी भाजपचे शिवराज घुले यांनी बाजी मारली असून त्यांच्या पॅनेलने सदस्यपदाच्या 17 पैकी 12 जागांवर विजय मिळविला आहे. सुरेश घुले यांच्या मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे.

येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रथमच जनतेतून मतदान झाले. त्यामध्ये मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलचे उमेदवार शिवराज घुले यांनी प्रतिस्पर्धी मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार कैलास घुले यांचा 447 मतांनी पराभव करीत ग्रामपंचायतवर कमळ फुलविले.

मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुरुषोत्तम धारवाडकर (1831) ,संजय पान धारवाडकर (1528),सुनिता घुले (1126), अमित घुले (1946), निर्मला म्हस्के (1745), सुमित घुले (1741), सुवर्णा कामठे (1325), सीमा घुले (1283), समीर घुले (1242), उज्वला टिळेकर (1195), नयना बहिरट (1062), प्रमोद कोद्रे (1016), तर मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार जयश्री संदीप खलसे (1729), नेहा सागर बत्ताले (1964), बालाजी सुदाम अंकुशराव (2399), आशा शिवाजी आदमाने (2622),निलेश दिलीप घुले (2218)

या ग्रामपंचायतीवर गेली पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश घुले यांचे निर्विवाद वर्चस्व होते. सरपंच पदी निवडून आलेले उमेदवार शिवराज घुले यांनी त्यांच्याशी फारकत घेत उपसरपंच पदाचा राजीनामा देवून भाजपचा झेंडा हाती घेतला होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वी इतर ग्रामपंचायतींबरोबर मांजरी बु्द्रुकचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यावर दोन्हीही गटांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दोन्हीही गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूकीत चुरस निर्माण झाली होती.

सुरेश घुले यांचे बंधू कैलास घुले तर आमदार योगेश टिळेकर यांचे कार्यकर्ते शिवराज घुले सरपंच पदाचे उमेदवार असल्याने दोन्हीकडूनही ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. राष्ट्रवादी विरूध्द भाजप-सेना असा रंग निवडणूकीत चढला होता. मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलसाठी आमदार टिळेकर यांच्यासह कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, माजी आमदार महादेव बाबर, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व एका केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नी प्रचारात उतरले होते. तर मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख सुरेश घुले यांनी स्वतः हा किल्ला एकांडेपणे लढविला. त्यामध्ये परिवर्तन पॅनेलने सरपंचपदासह तेरा जागांवर विजय मिळवीत मांजरी ग्रामपंचायतवर सत्ता प्रस्थापित केली आहे.

मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. सरपंच पदाच्या लढाईत पराभव झाला असला तरी आमचे सर्व कार्यकर्ते व कुटुंब जनतेच्या सेवेत कोठेही खंड पडू देणार नाही. असे सुरेश घुले यांनी सांगितले. आम्ही प्रामाणिकपणे निवडणूक लढलो असून पराभव मान्य आहे. पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले आहेत. सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभारी आहे. यापुढेही लोकांसाठी काम करत राहणार आहे असे कैलास घुले यांनी सांगितले.