Thu, Apr 25, 2019 14:04होमपेज › Pune › संघासह भाजपचा संविधान बदलण्याचा डाव : डॉ. रत्नाकर महाजन 

संघासह भाजपचा संविधान बदलण्याचा डाव : डॉ. रत्नाकर महाजन 

Published On: Jan 26 2018 6:56PM | Last Updated: Jan 26 2018 7:00PMपिंपरी- प्रतिनिधी  

भारताच्या तिरंगा ध्वजास आरएसएसचा प्रथम पासूनच विरोध होता. भारताचा राष्ट्रध्वज भगवा असावा ही आरएसएसची इच्छा होती. परंतु घटना समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्‍या निर्णयामुळे आरएसएसचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत. भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावे ही आरएसएसची इच्छा धुळीस मिळाली.  स्वातंत्र्यानंतर प्रथमच  भाजपच्या नावाखाली आरएसएस सत्तेवर आली आहे. त्‍यांचा हिंदुत्‍वाचा छुपा अजेंडा संविधानात बदल केल्‍याशिवाय पूर्ण  होणे शक्‍य नाही.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील सज्ञान जनता हे होऊ देणार नाही. संविधान बदलण्याचा प्रयत्‍न केल्‍यास काँग्रेस त्याला तीव्र विरोध करेल.  असे प्रतिपादन  प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी शुक्रवारी केले. तिरंग्यास विरोध केलेले लोकच ‘तिरंगा रॅली काढत आहेत. ही हास्यासस्पद गोष्ट असल्याची टीका त्यांनी केली. पिंपरी चिंचवड शहर  काँग्रेसच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजप सरकारच्या विरोधात ‘संविधान बचाव लोकतंत्र बचाव’ या मुकमोर्चाचे आयोजन केले होते. प्रारंभी चिंचवड येथील चाफेकर चौकात झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर एचए कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मुक मोर्चास सुरुवात झाली. 

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता होऊन तेथे सभा घेण्यात आली त्यावेळी डॉ. महाजन बोलत होते. यावेळी  काँग्रेस  शहर अध्यक्ष सचिन साठे, सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, चिंचवड विधानसभा युवक  अध्यक्ष मयुर जयस्वाल ,राजेंद्र वालिया,  फय्याझ शेख,  मुगूटमल,  लक्ष्मण रुपनर,  सज्जी वर्की, राजन नायर, आदी सहभागी झाले होते. 

डॉ. महाजन पुढे म्हणाले की, काँग्रेसने राज्यात संविधान बचाव रॅली काढली आहे. जो भाजप तिरंग्यास विरोध करतो तेच ‘तिरंगा रॅली यात्रा काढत आहेत. ही मोठी हास्यासस्पद गोष्ट आहे. सरकार असे उद्योग करुन समाजामध्ये फुट पाडण्याचे काम करत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना देखील फसवी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून उद्योगपतींना कर्जमाफी देऊन जनतेची क्रुर थट्‌टा केली आहे. निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी  फसव्या घोषणा केल्या. त्‍यातील एकही घोषणा अद्यापही पूर्ण झाली नाही. काँग्रेसने आग्रह धरला म्हणूनच शेतकऱ्यांना एवढी तरी कर्ज माफी मिळाली, असे डॉ. महाजन यांनी सांगितले. शहर अध्यक्ष सचिन साठे यांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार टिका केली. सत्ताधारी पाशवी बहुमताच्या जोरावर चुकीचे निर्णय घेत आहे. भाजप दरोडेखोर आहे आणि त्यांना साथ देणारी शिवसेना वॉचमनचे काम करीत आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.