Mon, Sep 24, 2018 00:08



होमपेज › Pune › भाजपने भ्रष्टाचाराच्या  सीमा ओलांडल्या

भाजपने भ्रष्टाचाराच्या  सीमा ओलांडल्या

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 09 2018 12:40AM



पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या आहेत. सत्तेचा सर्वाधिक उपभोग कोण घेतो यासाठी त्यांच्यात स्पर्धा व ‘सावळा’ गोंधळ सुरू असल्याने ही महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी गुरुवारी पत्रकार परिषेदेत केली.

काँग्रेसच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेस महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, विष्णू नेवाळे, संग्राम तावडे, गौतम आरकडे, राजेंद्रसिंह वालिया, मावळ लोकसभा मतदारसंघ युवा काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड विधानसभा मतदारसंघ युवा काँग्रेसचे अध्यक्ष मयूर जैसवाल आदी उपस्थित होते. 

साठे म्हणाले की, पालिकेत भाजपची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे; मात्र त्यांची कामाची दिशा पाहून जनतेची दशा झाली आहे. भाजपने पालिकेत भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या आहेत. त्यांच्या स्वपक्षीय खासदारानेच 425 कोटी रुपयांच्या कामात ‘रिंग’ झाल्याबाबत नाराजी व्यक्त केल्याने विरोधकांनी बोलण्याची गरज उरली नाही. राष्ट्रवादी भ्रष्टवादी असल्याचा आरोप करणारे आणि आम्ही सत्तेवर आल्यानंतर त्यांना आत टाकू, अशी भाषा करणार्‍या भाजपने त्यांना आत घेतले आहे. 

भ्रष्टाचाराची चौकशी झाली, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना ‘क्‍लिन चिट’ देणार हे निश्‍चित आहे. त्यापेक्षा ही महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी साठे यांनी केली. महापालिकेत एवढा भ्रष्टाचार सुरू असताना शिवसेनेची भूमिका अतिशय संशयास्पद आहे. त्यांचा चोरीला आक्षेप आहे की, चोरीच्या वाट्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे,  हे समजत नाही. भाजपमध्ये त्यांच्याच लोकप्रतिनिधींना किंमत नाही.

माजी खासदार नाना पटोले यांना बाहेर पडावे लागले. पिंपरी पालिकेत एका नगरसेवकाला अनधिकृत ‘फ्लेक्स’च्या विरोधात पालिकेत आंदोलन करण्याची वेळ आली, याची आठवण साठे यांनी करून दिली. मेट्रोसारखी पूर्वीच्याच सरकारने केलेली कामे आपण केल्याचे भाजप दाखवत आहे; मात्र मेट्रो निगडीपर्यंत न्यायची की पिंपरीपर्यंत याबाबत त्यांच्यातच मेळ नाही. आमदार मेट्रो निगडीपर्यंत होणार असे सांगतात, तर पालकमंत्री पिंपरीपर्यंत मेट्रो होईल, असे सांगतात. कोणाचाच कोणाला मेळ नाही, असे साठे म्हणाले.

या वेळी साठे यांनी पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून पृथ्वीराज साठे, संग्राम तावडे, शानी नौशाद यांची, तर ब्लॉक अध्यक्षपदी विष्णू नेवाळे (भोसरी), बाळासाहेब साळुंखे (पिंपरी), व परशुराम गुंजाळ (चिंचवड) यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पक्षपात:  शहराध्यक्ष सचिन साठे 

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पक्षपातीपणा केला जात आहे, असा आरोप करून साठे म्हणाले की, पिंपरीतून महापालिकेची निवडणूक लढविलेल्या भाजप उमेदवाराच्या विशालनगर येथील वॉईन शॉपवर कारवाई का होत नाही. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचे अस्तित्व जाणवत नसल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.  

‘रिंग’चा आरोप

पालिकेत समाविष्ट गावातील 425 कोटींच्या विकास कामात; तसेच वाकड येथील सीमाभिंतीच्या कामात भाजपने ‘रिंग’ केली आहे. भाजपने भ्रष्टाचार करण्यासाठी सीमाभिंत देखील सोडली नाही, अशी टीका साठे यांनी केली.