Tue, May 21, 2019 12:10होमपेज › Pune › यमुनेकाठी पुणेकराने फुलविली ‘बीडीपी’सृष्टी

यमुनेकाठी पुणेकराने फुलविली ‘बीडीपी’सृष्टी

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 12:55AMपुणे : किरण जोशी

बीडीपी..बीडीपी म्हणत पुण्यात जैवविविधता उद्यानाचे एक तपापासून केवळ चर्वण सुरू असताना एका पुणेकरानेच दिल्लीत यमुनेच्या तीरावर जैवविविधता पार्कचे स्वप्न पूर्ण केले आहे. तेथे दोन हजारांवर पाणपक्ष्यांचा संचार अन् बिबट्यांचेही दर्शन झाले. आता महाबळेश्‍वर आणि कोल्हापुरातही जैवविविधतेसाठी काम सुरू झाले आहे, पण प्रदूषणाच्या चेंबरमध्ये गुदमरणारे पुणे मात्र टेकड्या कुरतडून निसर्गाचा गळा घोटत कागदावरच जैवविविधतेचे गोडवे गात आहे.

पुण्यातली हवा आणि पाण्याचे जगभरात कौतुक व्हायचे पण, वाढत्या नागरिकरणामुळे निसर्गाचा र्‍हास होऊ लागल्याने बीडीपी अर्थात जैवविविधता उद्यानाची संकल्पना उचलून धरण्यात आली. यासाठी सुमारे 1800 हेक्टर जागा आरक्षित ठेऊन नामशेष झालेली वृक्षवल्ली, पशू-पक्ष्यांसाठी पुन्हा अधिवास निर्माण करायचा हा या मागचा उद्देश होता. मात्र, जागांवर कागदोपत्री आरक्षण असले तरी मोबदला, अतिक्रमण या मुळे ही संकल्पना अद्याप साकार होऊ शकलेली नाही.

दरम्यान, याच कालावधीत दिल्लीत पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना पुण्यातील पर्यावरण अभ्यासक विलास गोगटे यांना यमुनेच्या तीरावर जैवविविधता वसविण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे पुण्यासारखी नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीपूरक नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली आणि केवळ पाच वर्षांत 525 एकर जागेत त्यांनी बीडीपी प्रकल्प साकार केला. एवढ्यावर न थांबता आरवली पर्वतरांगेत जेथे जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड   झाली होती, तेथेही जैवविविधता पुन्हा निर्माण करण्यात त्यांना यश आले. 

क्षारपड जमिनीवर नंदनवन

एकेकाळी ‘ग्रिनेस्ट कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हणून नावलौकिक असणार्‍या दिल्लीची हवा बिघडल्याने राज्यपाल विजय कपूर यांनी बीडीपीची संकल्पना उचलून धरली. एका कार्यशाळेच्या निमित्ताने गोगटे त्याठिकाणी गेले असता कपूर यांच्याशी भेट झाली आणि कपूर यांनी त्यांना हे काम करण्याची संधी दिली. याबद्दल गोगटे म्हणाले, नदीच्या काठावर वर्षांनुवर्ष पावसाचे पाणी साचून क्षारपड झालेली जमीन आम्हाला मिळाली त्यामुळे आव्हान होते पण, पर्यावणपूरक एक प्रकल्प करताना दुसर्‍या ठिकाणच्या परिसंस्थेला धक्का द्यायचा नाही, असे ठरविले असल्याने दुसर्‍या ठिकाणी डोंगरफोड करून दगड किंवा माती आणायची नाही, असे ठरविले.

नदीकाठची माती एकत्र करून भराव तयार केले आणि मोठ्या तळ्याचे रूप आले. पावसाचे पाणी साठले. फिलाफ्रुटीकोसासारख्या  क्षार ओढून घेणार्‍या पाणवनस्पती लावल्या. पाण्यातील क्षार कमी झाल्यावर विविध जातीचे गवत वापरून जमिनीचा कस वाढवला. नायट्रोजनचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध झाडे लावण्यास सुरुवात केली. एरवी नैसर्गिकरीत्या 100 वर्षांत निर्माण होणार नाही, अशी जैवविविधता निर्माण झाली.

बिबट्या, नीलगाय अन् परदेशी पक्ष्यांचे आगमन

आता या ठिकाणी पाणवनस्पती, विविध मासे, जलचर दिसू लागले आहेत. स्थानिक जैवविविधतेबरोबरच परदेशातूनही पक्ष्यांचे स्थलांतर होत आहे. पूर्वी येथे 27 पक्षी होते, तर आता दोन हजारांहून अधिक पक्ष्यांचा अधिवास आहे. फुलपाखरांच्या शेकडे जाती येथे आहेत. यमुनेच्या काठाहून आलेल्या नीलगाय, रानडुक्करांचा येथे अधिवास आहे. इतकेच नव्हे तर मध्यंतरी येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने जैवविविधता उद्यान म्हणून यावर शिक्कामोर्तब झाले.आता तर पर्यावरणविषयक संशोधन करणारे देशातील शेकडो विद्यार्थी येथे भेट देत आहेत.

प्रत्येकाने बघण्यासारखे प्रकल्प

महाबळेश्‍वर येथे प्रदूषण वाढल्याने तेथेही बीडीपीचे काम सुरू आहे. येथेही गोगटे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. येथील जंगलातील नष्ट होत असलेली वनसंपदा आणि जैवविधिता टिकविण्यासाठी हा प्रकल्प सुरू असून प्रत्येकाने बघण्यासारखे आहेत, असे गोगटे म्हणाले. त्याचप्रमाणे पश्‍चिम घाटातील नाहीशी होत असलेल्या वृक्षांचे बियांचे जतन करून, रोपे तयार करून ती पुन्हा घाटात लाऊन हे वृक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगात केवळ 3 वृक्ष अस्तित्वात आहेत, अशा वृक्षांचाही यामध्ये समावेश आहे.

आपण डोळे बंद करून गंमत पाहतोय!

देशात अनेक ठिकाणी जैवविविधता उद्यानाचे काम सुरू असताना पुण्यात का होऊ शकत नाही? या प्रश्‍नावर गोगटे यांनी मार्मिक उत्तर दिले. मी लहानपणापासून पुण्याचे वातावरण अनुभवत आहे. पूर्वीचे पर्यावरण आणि आत्ताचे यात खूप फरक आहे. पर्यावरणाबाबत आपण गंभीर नसेल तर याचे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागतील पण, सध्या आपण सर्व जण डोळे मिटून गंमत पहात आहोत.