पिंपरी : प्रतिनिधी
शिवसेना व कम्युनिस्ट पार्टीचे हाडाचे वैर आहे. तरी देखील कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांचे काम पाहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी त्यांचा सन्मान केला. कधी-कधी केलेल्या कामाचे फळ मिळत नाही; मात्र निराश न होता काम करत राहणे गरजेचे असते. आपल्या कामाची दखल निश्चित घेतली जाते. पुरस्कार मिळणे म्हणजे आपल्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने उद्धवश्री पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई बोलत होते. या वेळी खा. श्रीरंग बारणे, आ. गौतम चाबुकस्वार, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, शिवसेना शहराध्यक्ष योगेश बाबर, इरफान सय्यद, सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, मधुकर बाबर आदींसह मान्यवर या वेळी उपस्थित होते.
उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, शिवसेनेकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला आहे. बिस्मील्ला खाँ, लता मंगेशकर आदींसह विविध नामांकित व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. चांगल्या गुणांची आठवण करून देण्यासाठी पुरस्कारांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. स्वर्गीय बाबासाहेब धुमाळ यांनी उद्धवश्री पुरस्काराचे आयोजन करून योग्य व्यक्तींचा सतत सन्मान केला. त्यांनी यापूर्वी कार्यक्रमाला बोलावले होते; मात्र वैयक्तीक अडचणींमुळे येऊ शकलो नाही. या वेळी बाबासाहेब धुमाळांना आदरांजली वाहण्यासाठी देखील या ठिकाणी आलो असल्याचे या वेळी देसाई यांनी सांगितले.
खा. बारणे म्हणाले की, शिवसेनेकडून नेहमीच रोखठोक भुमिका घेत राजकारणविरहीत समाजकारण केले आहे. जनतेवर अन्याय होऊ लागल्यानंतर त्यांच्यासाठी पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या विरोधातही परखड मते व्यक्त केली आहेत. मावळ मतदारसंघातील अनेक शेतकर्यांचे प्रश्न रखडले होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यामार्फत 720 हेक्टर जागेवरील सात बाराचे शिक्के काढून शेतकर्यांना न्याय दिला आहे. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी प्रस्ताविक केले. अभिनेता भुषण कडू यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली.
पुरस्कारामध्ये बाळासाहेब लांडगे (क्रीडा), गोपाळ देवांग (क्रीडा), संजय नहार (सामाजिक), राजन खान (साहित्यिक), प्रभाकर ओव्हाळ (ज्येष्ठ साहित्यिक), दीप्ती चंद्रचुड (औद्योगिक), भाऊसाहेब कर्हाडे (कला), डॉ. पंकज बोहरा (वैद्यकीय), देवदत्त कशाळीकर (छायाचित्रकार), एम. ए. हुसेन (सामाजिक), राहुल धोत्रे (क्रीडा), कैलास पुरी (पत्रकारिता), भूषण तोष्णीवाल (सनदी लेखापाल), डी. एम. खुणे (सनदी लेखापाल), गोविंद दाभाडे (शैक्षणिक), मिलिंद शिंदे (गायक), किशोर ढोकळे (कामगार नेते), बबन कांबळे (पत्रकारिता) आदींना या वेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.