Fri, Mar 22, 2019 00:19
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पात्र नसताना तावडेंच्या ‘ओएसडी’ला पुरस्कार

पात्र नसताना तावडेंच्या ‘ओएसडी’ला पुरस्कार

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 1:02AMपुणे : देवेंद्र जैन 

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वादग्रस्त विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) कविता नावंदे यांना पात्रता नसतानाही क्रीडा संचलनालयाने जिजामाता पुरस्कार बहाल केल्याचे प्रकरण समोर आले आहे.सरकारने 2004 साली जिजामाता पुरस्काराची सुरुवात केली. ज्यामध्ये राज्यातील उत्कृष्ट महिला क्रीडा मार्गदर्शकास हा पुरस्कार देण्याची तरतूद केली. सन 2006 मध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या नियमावलीमध्ये काही सुधारणांचा अंतर्भाव करण्यात आला, ज्यात यापुढील काळात जिजामाता पुरस्कार राज्यातील महिला क्रीडा संघटक व कार्यकर्तीस देण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये करण्यात आली. नावंदे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी संगनमत करून हा पुरस्कार मिळवून शासनाची व पात्र उमेदवारांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सन 2012 मध्ये शासनाने मागील तीन वर्षांच्या क्रीडा खात्याच्या प्रलंबित पुरस्कारांकरिता प्रसारमाध्यमांतून जाहिरात दिली. या काळात नावंदे या पुणे येथे कार्यरत होत्या. 

त्यांनी 2009/10 वर्षासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक व जिजामाता या दोन्ही पुरस्कारांकरिता अर्ज केला. अर्जामध्ये नावंदे यांना चारित्र्य तपासणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक होते; जे त्यांनी जोडले नव्हते. कारण त्यांच्यावर त्यावेळी सातारा येथे फौजदारी गुन्हा होता. संचलनालयाने आलेल्या सर्व अर्जांची छाननी केली, त्यामध्ये उत्कृष्ट मार्गदर्शक या पुरस्काराकरिता त्यांचे गुण 718 होते व इतर अर्जदारांचे गुण जास्त होते. त्यामुळे नावंदे या पुरस्काराकरिता पात्र ठरल्या नाहीत. मग नावंदे यांनी त्यांच्या प्रशासनामध्ये असलेल्या ओळखीचा वापर करून जिजामाता पुरस्कार मिळण्याकरिता प्रयत्न केला. पण नावंदे यांचे पुरस्काराच्या नियमावलीनुसारही गुण नसल्यामुळे त्या येथेही पात्र ठरल्या नाहीत.

सरकारच्या 1 ऑक्टोबर 2012 च्या शासन निर्णय क्रमांक 6 मधील 1 व 2 नुसार, नावंदे या कोणत्याही पुरस्काराकरिता पात्र ठरत नव्हत्या. असे असताना तत्कालीन क्रीडा आयुक्त सतीश कार्ले व संचालक नरेंद्र सोपल यांनी शासनाकडे पाठवण्यात येत असलेल्या यादीत नावंदे यांचे नाव जिजामाता पुरस्काराकरिता घुसडले व या नावाला शासनाच्या निवड समितीने मान्यता दिली. या प्रकारामुळे क्रीडा खात्याच्या मनमानी कारभाराचा प्रत्यय आला आहे व हे खाते पुरस्कारांचे कसे अवमूल्यन करते हे उघडकीस आले आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते शरद काळे म्हणाले की, नावंदे यांना कोणत्या कारणांसाठी हा पुरस्कार दिला हे शोधणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये जे अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर शासनाची व पात्र उमेदवारांची फसवणूक केल्याचा गुन्हादेखील दाखल करण्यात यावा.