Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Pune › ‘रिपीटेटिव्ह’ प्रकारच्या नोकर्‍यांना ऑटोमेशनचा फटका

‘रिपीटेटिव्ह’ प्रकारच्या नोकर्‍यांना ऑटोमेशनचा फटका

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:32AMपुणे : लक्ष्मण खोत 

एकीकडे ऑटोमेशनमुळे नोकर्‍या जाऊन बेरोजगारी वाढत असताना, तेवढ्याच प्रमाणात नवनवीन कौशल्य असलेल्या नोकर्‍या निर्माण होत आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे नोकर्‍या जाण्याची भिती असल्याने, कर्मचार्‍यांनी आपली वर्षानुवर्षे अंगी भिनलेली कार्यपद्धती त्वरित बदलण्याची आवश्यकता असलल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

जगभरातील उद्योग-व्यवसाय-रोजगार विश्वात सध्या ‘ऑटोमेशन’, हा परवलीचा शब्द झाला आहे. जगभरात ‘ऑटोमेशन’चे वारे वाहत असून, भारतातही त्याचे लोण पसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षात आयटी कंपन्यांतून एका क्षणात काही हजार कामगारांना काढून टाकल्याच्या घटना वाचनात येत असतात. आयटी, बँकींग क्षेत्रात कंपन्या भराभर ‘ऑटोमेशन’ स्वीकारत असल्याने, येत्या काळात बरेच रोजगार माणसांच्या हातून जाणार असल्याची भिती तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जात आहे.

‘ऑटोमेशन’मुळे कामाचे स्वरूप बदलत आहे. कंपन्या आपले उत्पादन वाढविण्यासाठी झपाट्याने ‘ऑटोमेशन’ करत आहेत. यांत्रिकीकरणामुळे ‘रिपिटेटिव्ह’ (त्याच त्या प्रकारच्या कामाची पुनरावृत्ती करावी लागणारे कामाचे स्वरूप) कामांमधल्या चुका कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच उत्पादन, अचूकता, नेमकेपणा वाढला आहे. असलेले यांत्रिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या बेसुमार वापरामुळे अनेक अकुशल कर्मचारी बेरोजगार होत आहेत. अशा कर्मचार्‍यांना नवीन कौशल्य शिकण्याची गरज आहे. 

सध्या ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ आणि ‘रोबोटिक्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बँका आणि आयटी क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा रोजगार नष्ट होत आहे. सॉप्टवेअर कंपन्यांमध्ये अनेक वर्षापासून ‘कोडींग’चे काम ‘ऑटोमेट’ (स्वयंचलित) करण्याचे काम सुरु आहे. आगामी काळात आयटी, ऑटोमोबाईल आणि बँकिंग क्षेत्रात अनेक बदल अपेक्षित आहेत. सध्या अस्तित्वात असलेले बरेचसे ‘जॉब’ काही वर्षापूर्वी आपल्याला माहितीही नव्हते. अशा नवनवीन क्षेत्रातील नोकर्‍या, नवीन कामे निर्माणही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

नवनवीन कौशल्याच्या अनेक संधी उपलब्ध 

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘ऑटोमेशन’ मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने अनेकांच्या नोकर्‍या जात आहेत. मात्र, या ‘ऑटोमेशन’कडे एक संधी म्हणून पाहिल्यास, अनेक संधी समोर येतात. साचेबद्ध कामे यंत्राद्वारे केली जात असली, तरी विश्लेषणात्मक, संवादात्मक कामाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. 

ऑटोमेशनमुळे सन 2035 पर्यंत आताचे 65 टक्के ‘जॉब’ नष्ट होणार आहेत, असे भाकित वर्तविण्यात येते. 1997 रोजी जेरिनी रिस्क्पिन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने ‘एन्ड ऑफ वर्ल्ड’ या पुस्तकात असं भाकित केले होत की, पुढील काही वर्षात तंत्रज्ञानामुळे प्रचंड बेकारी निर्माण होईल. मात्र, तसं काही झालं नाही. त्याचं कारण अनेक वेगळ्या प्रकारचे नवीन जॉब तयार झाले. नोकर्‍यांचे स्वरुप बदलले. नजीकच्या काळात रिपीटेटिव्ह जॉब नष्ट होणार आहेत. तसेच जोखमीचे आणि कंटाळवाणे जॉबही नष्ट होतील. जपानमध्ये काही वर्षापूर्वीच याला सुरवात झाली आहे. अनेक वेगळे जॉब तयार होणार आहेत. एटीएम आल्यामुळे टेलरक्‍लास नष्ट झाले. तर अ‍ॅनीमेशन आल्यामुळे आर्टिस्टचे जॉब गेेले. ऑटोमेशनमुळे जेवढे जॉब जाणार आहेत, तेवढे ‘जॉब’ निर्माण होतील की नाही, यात शंका आहे.    - अच्युत गोडबोले, अभ्यासक