Tue, May 21, 2019 00:28होमपेज › Pune › प्राधिकरण सदस्य निवडीतील ‘वाट्या’मुळे भाजप कार्यकर्ते गॅसवर

प्राधिकरण सदस्य निवडीतील ‘वाट्या’मुळे भाजप कार्यकर्ते गॅसवर

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 2:13AMपिंपरी ः संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांची निवड करण्यात आली आहे. खाडे यांच्यासह सात जणांची समिती नियुक्त करण्यात येणार आहे. नियमानुसार दोन नगरसेवक घेणे बंधनकारक आहे. सदस्य निवडीत भाजपाला 60 आणि मित्रपक्षाला 40 टक्के असा फॉर्मुला तयार केल्याने सदस्य निवडीत शिवसेना आणि आरपीआयला संधी देण्यात येणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. त्यामुळे सदस्य पदात वाटेकरी वाढल्यामुळे प्राधिकरण सदस्य होण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या भाजप कार्यकर्ते सध्या गॅसवर असल्याचे पाहवयास मिळत आहेत.

भाजपचे निष्ठावंत आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक भाजप प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 31) जाहीर केली. दीड वर्षे ज्या पदासाठी संघर्ष सुरू होता त्या पदाला खाडे यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे पक्षांतर्गत विरोध होऊनही गवसणी घातली. त्याबाबतचे गॅझेट गुरुवारी (दि.6) पास झाल्यानंतर शुक्रवारी (दि.7) खाडे यांनी पदभार स्वीकारला. खाडे यांची अध्यपदी निवड झाल्यानंतर भाजपवासीयांना समिती सदस्य पदाचे वेध लागले. शिक्षण मंडळावर कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्यामुळे किमान प्राधिकरण सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी सोमवारी  प्रत्येकाने आपल्या गॉडफादरसह मुंबई गाठली. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरात शहराचे कारभारी आणि प्रमुख ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक झालेचे ही समजते.

परंतु, प्राधिकरण सदस्यपदी भाजपचे मित्रपक्ष असणार्‍या शिवसेना आणि आरपीआयला ही संधी देण्याचे पक्षाचे ठरविल्याचे समजते. तसेच सातपैकी पालिकेतील दोन नगरसेवक यांना ही नियमाने संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे सातपैकी अध्यक्ष, मित्रपक्ष आणि दोन नगरसेवकांपैकी एक मित्रपक्ष असणार्‍या शिवसेनेचा नगरसेवक किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याचे धोरण शिवसेना ठरविणार आहे. त्यामुळे सातपैकी अध्यक्षासह चार जणांना सोडले, तर राहिलेल्या तीन किंवा चार जागांवर भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागणार आहे. 

भाजप सरकारने मित्रपक्षांना संधी देत महामंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तर काही ठिकाणी फक्त अध्यक्षच जाहीर केले आहेत. जाहीर झालेल्या महामंडळावर जवळपास 360 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुद्दा समोर आल्यामुळे महामंडळ सदस्य निवड लांबणीवर पडली आहे. 15 सप्टेंबरच्या पुढेच या सदस्य निवड होणार असल्याचे समजते; मात्र पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण सदस्य निवडीत मित्रपक्षांसह दोन नगरसेवकांचा नियम आडवा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये आपणाला संधी मिळणार की नाही यावरून साशंकता निर्माण झाल्यामुळे तिन्ही विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरांकडे तगादा लावल्याचे समजते. कार्यकर्त्यांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसमोर कोणाला संधी द्यायची हा बाका प्रसंग उभा राहिल्याची जोरदार चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.