Tue, Jul 16, 2019 21:51होमपेज › Pune › प्राधिकरणातील नागरिकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’

प्राधिकरणातील नागरिकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 1:06AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 42 पेठांमधील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्ड लवकरच मिळणार आहेत. प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 2 मध्ये सध्या प्रायोगिक तत्त्वावर भूमापन विभागाच्या वतीने हक्क चौकशी कामकाज सुरू आहे. प्रत्येक मालमत्ताधारकाच्या घरी जाऊन भूमापन विभागाच्या वतीने हक्क चौकशी करण्यात येत आहे. येत्या चार दिवसांमध्ये पेठ क्रमांक 2 मध्ये हक्क चौकशी कामकाज झाल्यानंतर त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहेत.

प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत असलेल्या पेठ क्रमांक दोननंतर प्राधिकरणाच्या सर्व पेठांमध्ये प्रॉपर्टी कार्डसाठी भूसंदर्भीकरण करण्यात येणार आहे. नगर भूमापन अधिकारी शिवाजी भोसले यांच्या समोर परीक्षण भूमापक संजय बांबळे, मंजिरी पाटील, श्रीधन नायकवडी, भूमापक अनिल पवार, अरुण थोरात यांच्या सहकार्याने हक्क चौकशी काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने दहा गावांमध्ये नवनगर विकसित करण्यात आले; मात्र कागदपत्रांचे अद्ययावतीकरण करण्यात प्राधिकरण पिछाडीवर राहिले. महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाते. प्राधिकरणातील रहिवाशांना याबाबतची सोय नव्हती. प्राधिकरणवासीयांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सेक्टर दोनपासून त्याची सुरुवात होणार आहे. 

कामगार कष्टकरी वर्गाच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. प्राधिकरणाच्या 42 पेठांपैकी अनेक पेठा विकसित झालेल्या नाहीत. अनेक पेठांवर अतिक्रमणे झाली आहेत. प्राधिकरणाकडे उपलब्ध असणार्‍या यंत्रणेमुळे प्राधिकरणाच्या बहुतांश क्षेत्रांचे नकाशे, सीमांकनाची कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सदनिका किंवा प्लॉटधारकांना येथे विविध कामांसाठी खेटे मारावे लागतात. नागरिकांना त्यांच्या प्लॉटचे प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे प्लॉट हस्तांतरणाचे, कर्ज काढणे अशी कामे सोपी होणार आहेत. 

राज्यातील पहिलाच प्रयोग

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असल्याची माहिती भूमापन अधिकार्‍यांनी सांगितली. ईटीएस (जमीन मोजणीचे आधुनिक मशिन)द्वारे भूमापन विभागाने पेठ क्रमांक दोनची मोजणी केली. प्रत्येक प्लॉटचे जीपीएसद्वारे भूसंदर्भीकरण करण्यात आले. यामुळे प्रत्येक प्लॉटच्या हद्दीचे कोपरे उपग्रहाला जोडले जाणार आहेत.