Wed, Apr 24, 2019 01:30होमपेज › Pune › औरंगाबादकरांना 9 नंबरची भुरळ

औरंगाबादकरांना 9 नंबरची भुरळ

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:50AMऔरंगाबाद : जे. ई. देशकर

हौसेला मोल नसते, असे म्हणतात ते खरेच आहे. केवळ आपल्या वाहनाला आवडता नंबर आणि त्यातल्या त्या नंबरच्या बेरजेतून होणारी आकडेमोड ही शेवटी 9 आली पाहिजे, यासाठी औरंगाबादकरांचा आटापिटा वाढला असल्याचे वर्षभरातून ‘आरटीओ’ला मिळालेल्या महसुलातून दिसून येत आहे. केवळ नंबरची बेरीज शेवटी 9 यावी यासाठी शहरवासीयांनी दीड कोटीपेक्षाही जास्त रुपये मोजले असल्याची माहिती समोर आली आहे. चॉईस नंबर व बेरजेच्या आकडेमोडीतून आरटीओ कार्यालयाला 2017-18 या वर्षात 2 कोटी 96 लाख 15 हजार रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून मिळाली.

मोबाइल नंबर असो की वाहनाचा नंबर, अनेक जण पसंतीच्या क्रमांकासाठी धडपडतात. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. याच माध्यमातून आरटीओ कार्यालयाला 2017 -18 या वर्षभराच्या कालावधीत दोन कोटी 96 लाख 15 हजारांचा महसूल मिळाला आहे; परंतु यात केवळ पसंती क्रमांकच नाही तर या क्रमांकाच्या बेरजेची फोड केल्यानंतर 9 अंक कसा येईल यासाठीही करोडो रुपये मोजल्याचे आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. आजकाल सर्वसामांन्यासह उच्च शिक्षितांचाही भविष्य जाणून घेणे किंवा शुभ अंक कोणता हे जाणून घेण्याकडे कल वाढला आहे. यातूनच मोबाइल क्रमांक असो किंवा वाहन क्रमांक असो याची बेरीज आपला असलेला शुभ अंक असावा, यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू आहे. अनेक वाहनधारक क्रमांकाची बेरीज 9 येईल, अशाच क्रमांकाची मागणी करत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Tags : Ahmadnagar, Aurangabad, loves, 9, numbers