Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Pune › जलसंपदामंत्र्यांचा पालिकेला सल्ला 

पुण्यातील पाणी वापराचे ऑडिट करा : महाजन 

Published On: May 05 2018 5:43PM | Last Updated: May 05 2018 5:43PMपुणे : प्रतिनिधी 

शहरासाठी ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त पाणी महापालिकेकडून खडकवासला धरणातून उचलण्यात येते. हे जास्तीचे पाणी नेमके जाते कोठे ? त्या पाण्याची कोणी चोरी करते का ? यासंबधीची पुर्ण माहिती घेण्याचे काम पालिकेचे आहे. यासाठी पालिकेने शहराच्या पाणीवापराचे ऑडिट करावे. तसेच पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून जास्तीत जास्त पाण्याच्या पुर्नवापर कसा होईल हे पहावे, असा सल्ला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी महापालिकेला दिला आहे. 

महाजन म्हणाले, पुणे शहरासाठी खडकवासला धरणातून ११ टीएमसी पाण्याचा कोटा ठरवून देण्यात आलेला आहे. प्रत्येक्षात मात्र महापालिकेकडून साडेसतरा टीएमसी पाणी उचलले जाते. जास्तीच्या पाण्याचा शोध पालिकेने लावणे गरजेचे आहे. आवश्यक तेवढेच पाणी वापरल्यास उर्वरीत पाणी इतर घटकांसाठी देता येईल. पिण्याच्या पाण्यास सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते. त्यानंतर शेती आणि उद्योगाचा विचार केला जातो. गरजेचे आहे. शहरातील नागरिकांनी जास्त पाणी वापरल्यास ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरी असा वाद निर्माण होते. 

खडकवासला धरण ते पर्वतीजलकेंद्र यादरम्यान असलेल्या कॅ नॅालची अवस्था बिकट व दयनिय आहे. या कॅनॅाल ला अतिक्रमण व घाणीने ग्रासले आहे. त्यामुळे यादरम्यानच्या बंदीस्त जलवाहिनेचे काम लवकरात लवकर पुर्ण होणे गरजेचे आहे. याजलवाहिनीमुळे पाण्याची गळती थांबणार आहे. जेवढ्या पाण्याचा वापर केला जातो, ते सर्व सांडपाणी नदीत सोडून देणे, म्हणजे इतर घटकांसमोर समस्या निर्माण करण्यासारखे आहे. त्यामुळे पालिकेने थेंब थेंब पाण्याचे काटेकोर नियोजन करून जास्तीत जास्त पाण्याचा पुर्नवापर करण्यावर भर दिला पाहिजे. 

भविष्यात शहराच्या भल्यासाठी जलसंपदा विभागाकडून जी मदत लागेल, ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत. तसेच जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जागांवर होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी या जागा पालिकेच्या माध्यमातून खेळाची मैदाने आणि सायकल ट्रॅक विकसित करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही आश्‍वासन महाजन यांनी यावेळी दिले. 

महापालिकेतर्फे पर्वतीजलकेंद्र येथे साकारलेल्या ५०० एमएलटी जलशुद्धीकार्ण प्रकल्पाचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॅा. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुअक्त शितळ उगले, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख विजय कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. 

यावेळी खा. अनिल शिरोळे, आ. माधुरी मिसाळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनीही मनोगत व्यक्त केले. महापौर मुक्ता टिळक यांनी प्रास्ताविक केले. तर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.