Tue, Nov 13, 2018 03:48होमपेज › Pune › मराठा आरक्षणाबाबत ७ ऑगस्टच्या निकालाकडे लक्ष

मराठा आरक्षणाबाबत ७ ऑगस्टच्या निकालाकडे लक्ष

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:11AMदेहूरोड : वार्ताहर

तब्बल 58 मूक मोर्चे काढल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाजाचे ठोक मोर्चे सुरू आहेत. या मोर्च्यांना हिंसक वळण लागल्यामुळे शासन खडबडून जागे झाले आहे. तर यासंदर्भात 7 ऑगस्टपर्यंत निर्णय जाहीर करण्याचा निर्वाणीचा इशारा सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे आता या निर्णयाकडे मराठा समाजाचे लक्ष लागले असून नऊ ऑगस्टच्या आंदोलनाची दिशा त्यानंतरच स्पष्ट करण्यात येईल, असा निर्णय रविवारी देहूरोड येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने राज्यभरात ठोक मोर्चे सुरू आहेत. ठोक मोर्चांनी सरकारी मालमत्तेसह खासगी मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यभरात सार्वजनिक वाहतूक सेवा आंदोलनाच्या भक्ष्यस्थानी पडली. बसगाडया जाळण्यात आल्या. 9 ऑगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्र बंदचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वी 7 ऑगस्टपर्यंत सरकारला अल्टिमेटम देण्यात आला आहे. सरकारने 7 तारखेपर्यंत आरक्षण जाहीर केले, तर नियोजित आंदोलन मागे घेण्यात येईल, असे समन्वयकांच्या वतीने यापूर्वीच जाहर करण्यात आले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर रविवारी येथे राजे शिवछत्रपती मराठा सोसायटी या संस्थेच्या कार्यालयात पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. दत्तात्रय तरस, अ‍ॅड. प्रवीण झेंडे, भाऊ राऊत, धनंजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते. आंदोलनाचे धोरण 7 ऑगस्टनंतर निश्‍चित करण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.