Mon, Mar 25, 2019 05:28
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › एकबोटेंबर न्यायालय परिसरात फेकली शाई

एकबोटेंबर न्यायालय परिसरात फेकली शाई

Published On: Mar 19 2018 4:19PM | Last Updated: Mar 19 2018 4:32PMपुणे : प्रतिनिधी 

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार अटक केलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. शिवाजीनगर) यांच्या पोलिस कोठडीत 21 मार्चपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दिला आहे. दरम्यान, सोमवारी एकबोटेंना न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. दरम्यान, शाई फेकणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे. 

दि. 14 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर एकबोटे यांना दि. 15 मार्च रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. 19 मार्च) पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार सोमवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर एकबोटे यांना दुपारी पावणेतीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.   न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्‍तिवाद ऐकल्यानंतर एकबोटे यांची 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

दरम्यान,  पुन्हा पोलिस कोठडीत नेत असताना त्यांच्यावर वकिलाच्या काळ्या-पांढर्‍या कपड्यात असलेल्या एकाने शाई फेकली. या प्रकारानंतर एकबोटे समर्थकांनी हल्‍ला करणार्‍याला आमच्या ताब्यात द्या. ‘मिलिंदभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या.   पोलिस प्रशासनाचाही निषेध केला.  अर्धा ते पाऊण तास न्यायालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

हल्‍ला करणारा सराईत

एकबोटेंना पोलिस कोठडीत नेत असताना त्यांच्यावर शाई फेकणार्‍याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. संजय हरिदास वाघमारे (40, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही खून, मारामारी, बनावट कागदपत्रे तयार करणे, अशा पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत. शाई प्रकरणात त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि कलम 351, 352, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबरोबर अन्य दोन संशयितांकडे चौकशी सुरू आहे. संजय हा सराईत वृत्तीचा असून गनिमी कावा प्रतिष्ठानचा तो संस्थापक अध्यक्ष आहे.

 

Tags : Attempts, throw, ink, milind ekbote, pune, pune news, koregaon-bhima, riots, Maharashtra, shikrapur police, police, milind ekbote, Nagar News, Pune News, Pune crime news, sambhaji bhide, prakash ambedkar, jignesh mevani, Milind Ekbote, Shiv Pratishthan, Umar Khalid,