Thu, Jun 20, 2019 14:54होमपेज › Pune › तू जल्दी आ जा.. नही तो कुदकर जान दे दुंगी !

शोले २ : विरुसाठी बसंती चढली टाकीवर

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 8:21AMवाघोली : वार्ताहर

शोलेमध्ये बसंतीसाठी वीरू पाण्याच्या टाकीवर चढलेला आपण पाहिला. परंतु शोलेची पुनरावृत्ती वाघोली येथे गुरुवारी (दि. 14) सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान नागरिकांना पाहायला मिळाली. विवाहित तरुणीने गर्भाशयात झालेल्या बदलाच्या तणावातून पाण्याच्या टाकीवर चढल्याचा प्रकार केल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले. 

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, एक हिंदी भाषिक 22 वर्षाची युवती वाघोली येथील बाजार तळ्याजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढली आणि ‘तू जल्दी आ जा, नही तो मै कुदकर जान दे दुंगी’ असे आपल्या मोबाईलवरून ती बोलत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. ती एका हाताने पाण्याच्या टाकीच्या लोखंडी कठड्याला पकडून स्वतःला झोकून देण्याच्या प्रयत्नात होती.

युवती पाण्याच्या टाकीवर गेल्याचे पाहून तिला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी तिला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. नीलेश सातव या युवकाने आपल्या मित्रासोबत टाकीवर जाऊन तिला धीर देत समजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्याठिकाणी पोलिस आल्यानंतर त्या मुलीला खाली उतरवण्यात यश आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन लोणीकंद पोलिस स्टेशनला आणले. साधारणतः अर्ध्या तासाहून अधिक वेळ चालू असलेला प्रकार अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेर्‍यामध्ये कैदसुद्धा केला. 

पोलिसांनी युवतीची चौकशी केली असता तिने आपण विवाहित असून पुणे शहराच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचे सांगितले. वाघोलीत मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. डॉक्टरांनी तिला गर्भाशयात बदल झाल्याचे सांगितल्याने तिच्यावर तणाव आला होता. त्याच तणावात पाण्याच्या टाकीवर गेले असल्याचे सांगितले. वर गेल्यानंतर अनेक लोक जमा झाले असल्याने लोक मारतील या भीतीने खाली येण्यास युवतीने नकार दिला होता. पोलिसांनी युवतीस ताब्यात घेतल्यानंतर तिच्या पतीला बोलावून घेण्यात आले. योग्य समज देऊन युवतीला पतीच्या ताब्यात देण्यात आले.  

टाकीचा वर जाण्यासाठीचा दरवाजा उघडाच 

कोणी वर जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाकीला असणार्‍या शिडीला लोखंडी दरवाजा आहे. मात्र तो उघडाच आहे. दरवाजाला कुलूप लावलेले असते तर हा प्रकार घडला नसता. उघड्या दरवाजामुळे हातभट्टी विक्रेते दारूचे फुगे वर ठेवून विक्री करत असल्याची माहिती नागरिकांनी यावेळी दिली. या पाण्याच्या टाकीखाली हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची बातमी ‘दै. पुढारी’ने प्रकाशित केली होती. रायसोनी महाविद्यालयाच्या इमारतीच्या खिडकीतून उडी मारून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना तशीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.