होमपेज › Pune › डेक्कन येथे बिल्डरवर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक

डेक्कन येथे बिल्डरवर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक

Published On: Jun 07 2018 5:52PM | Last Updated: Jun 07 2018 5:52PMपुणे : प्रतिनिधी 

जमीनीच्या वादातून डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरात असलेल्या बिल्डरच्या कार्यालयात घूसून दोघांनी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. यात बिल्डर कृष्णा उर्फ बापू शेटे(72) व नेहा नितीन जाधव (47) ही  वकील महिला जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

अजित गणपत गोगावले (45, मांजरी हडपसर) व अमित अरुण वाल्हेकर (31,काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नेहा जाधव यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटे यांचे प्रभात रस्ता येथील बुट्टे पाटील क्लासिक इमारतीमध्ये कार्यालय आहे. दरम्यान त्यांचे व अजित गोगावले यांचे जमीनीच्या व्यवहारातून वाद होते. या वादातून अजित गोगावले व त्याचा साथीदार अमित वाल्हेकर हे दोघे गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांच्या कार्यलयात आले. त्यांनी शेटे यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या नेहा जाधव या महिलेवरही कोयत्याने वार करत त्यांच्या हाताचे बोट तोडले. त्यानंतर एकच धांदल उडाली. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेटे व जाधव यांना रुग्णालयात दाखल केले व दोघा हल्लेखोरांना अटक केली. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.