Thu, May 28, 2020 16:21होमपेज › Pune › इन्स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

इन्स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published On: May 16 2019 2:10AM | Last Updated: May 16 2019 2:20AM
पुणे : प्रतिनिधी

इन्स्ट्राग्रामवर ओळख झालेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत जबरदस्तीने बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रथम नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित तरुणीची आणि आरोपीची इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली होती. दोघेही चॉटिंगद्वारे बोलत होते. यादरम्यान, पीडित मुलीला फूस लावून आरोपीने पळवून नेले. तसेच, तिच्यावर बलात्कार करून परत आणून सोडले.

इंजिनिअर तरुणाला गंडा

बायोमेडिकल इंजिनिअर तरुणाला नोकरी लावण्याचे आमिषाने दोन हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणाला नोकरीची आवश्यक्ता होती. यामुळे त्याने नोकरी डॉट कॉम तसेच इनडीड डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज केला होता. यानंतर आरोपींनी या तरुणाशी संपर्क साधून त्याचा विश्‍वास संपादन केला. यानंतर इंडीगो एअरलाईन्स बायोमेडीकल विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून त्याच्याकडून 2 हजार 100 रुपये घेतले. तरुणाने पैसे परत मागितले असता त्याला ते परत न देता त्याची फसवणूक केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील हे करत आहेत. 

कारने दुचाकीस्वार तरुणांना उडविले

भरधाव कारने तरुणांच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. विश्रांतवाडीत सावंत पेट्रोल पंपासमोर ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. रोहित क्षेत्रीय (वय 19 ) व दीपक (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) असे जखमी झालेल्यांचे नाव आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित व त्याचा मित्र दीपक हे दोघे मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. या वेळी पेट्रोल पंपासमोर पाठीमागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. यात दोघेही खाली कोसळले. रोहित याचा पाय फ्रॅक्‍चर झाला आहे. तर, दीपक याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

ज्येष्ठ महिलेला 48 हजारांचा गंडा 

पादचारी ज्येष्ठ महिलेला सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून दोघांनी 48 हजार रुपयांचे दागिने पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर भागात ही घटना घडली. याप्रकरणी मुक्‍ताबाई जवळकर (वय 65, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळकर यांची विवाहित मुलगी हडपसर भागात राहायला आहे. दोन दिवसांपूर्वी जवळकर हडपसर भागातील विधाते कॉलनीजवळून जात होत्या. त्यावेळी दोघेजण त्यांच्याजवळ आले. आमच्याकडे सोन्याचे बिस्कीट आहे. तुमचे दागिने दिल्यास त्याबदल्यात सोन्याचे बिस्कीट देतो, असे आमिष त्यांना दाखविले. बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील दागिने काढून घेतले. त्यांना सोन्याचे बिस्कीट म्हणून पिवळसर रंगाच्या धातूचे बिस्कीट दिले. बिस्किटांबाबत चौकशी केल्यानंतर ते सोन्याचे नसल्याचे उघडकीस आले.

ठाण्यातील महिलेचे दागिने बसमधून लंपास

पीएमपीएमएल आळंदी ते स्वारगेट या मार्गावरील बसस्मधून प्रवासादरम्यान, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील 33 वर्षीय महिलेच्या पिशवीतून दागिने व रोकड असा 78 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या.  शहरात गेल्या काही दिवसांपासून पीएमपीएमएल तसेच एसटी बस प्रवासादरम्यान ऐवज चोरीच्या घटना मोढ्या प्रमाणात घडत आहेत. नगर रस्ता, स्वारगेट भागात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन हे चोरटे डल्ला मारत आहेत. सध्या शहरात उन्हाळी सुट्टीमुळे अनेकजन पुण्यात येत आहेत. त्याचा फायदा चोरटे घेत आहेत. मात्र, पोलिसांचे या घटनांकडे म्हणावे तसे लक्ष नसल्याचे दिसत आहे. 

चाकू घेऊन आरडाओरडा करणार्‍याला सक्‍तमजुरी 

चाकू घेऊन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्‍याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना पानसरे यांनी चार महिने सक्‍तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अमोल जिवराज पिल्ले (वय 27, रा. जयजवाननगर, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. अमोल पिल्ले हा 15 एप्रिल 2012 रोजी येरवड्यातील जयजवाननगर येथे चाकू हातात घेऊन आरडाओरडा करीत होता. त्यावेळी त्याला येरवडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. बेदरे यांनी अटक केली होती. या खटल्याचे कामकाज सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी पाहिले.