Tue, May 21, 2019 22:10होमपेज › Pune › ...पुण्याशी ‘अटल’ ॠणाबंध

...पुण्याशी ‘अटल’ ॠणाबंध

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 1:32AMपुणे : प्रतिनिधी 

पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांसह, असंख्य व्यक्‍तींशीदेखील अटलजींचे कायम ॠणाबंध राहिले. जनता पक्षाच्या प्रचारासाठी झालेले स.प. महाविद्यालयतील त्यांची जाहीर सभा, गदिमाराचित गीतरामायणाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात, कवीमनाच्या अटलजींचे झालेले ओघवते भाषण, पुणेकरांच्या कायम स्मरणात राहिलं. याच बरोबर टिळकस्मारकमध्ये अटलजींच्या उत्कट भाषणाचा उल्‍लेख आजही सर्वांच्या लक्षात आहे. 

1964-65 साली अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बाराशे प्रतिनिधींची बैठक त्यावेळेसच्या अनाथ विद्यार्थी गृहात आयोजित करण्यात आली होती. त्या सभेच्या भोजनाची व्यवस्था माझ्याकडे होती. बैठक झाल्यानंतर सर्वांचा सत्कार झाला. त्यावेळेस अटलजींनी माझी पाठ थोपटत माझा सत्कार केला. तेव्हापासून त्यांच्याशी मैत्री झाली. त्यानंतर पुण्यात आले, की त्यांची भेट व्हायचीच. आण्णा जोशींना उमेदवारी मिळावी यासाठी मी त्यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यांनी तो पाळला. पंतप्रधान असताना त्यांच्या गुडघ्यांवर मुंबईत ऑपरेशन झाले, त्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. सुरक्षा रक्षकांनी केवळ पाच मिनिटांपेक्षा अधिक बोलू नका असे बजावले होते. त्यानुसार त्यांना भेटून निघालो, त्यावर अटलजींना एवढी घाई का करतोयस, असे विचारले. मी सुरक्षारक्षकांकडे बोट दाखविले मग त्यांनी सुरक्षा रक्षकांनाच बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर खूप वेळ गप्पा मारल्या. तेथून निघाल्यावर त्यांचे गुडघेच पहायला विसरलो. त्यांना मी विचारले गुडघे कसे आहेत, त्यावर त्यांनी मला तरी काय माहित, आता चालायला लागल्यावरच कळेल असे उत्तर दिले, असे अटलजी हे दिलखुलास व्यक्तीमहत्व होते. अशा आठवणींना त्यांचे पुण्यातील मित्र हरिभाऊ नगरकर यांनी उजाळा दिला.

पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा..

पुणे श्रमिक पत्रकार संघाने  1993 मध्ये अटलजींचा वार्तालापाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी केलेल्या पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात एक पत्रकार या नात्याने अटलजींनी वैयक्‍तिक पाच हजार रुपये पुणे श्रमिक पत्रकार संघाला दिले होते. त्यावेळी तात्कालीन अध्यक्ष व सरचिटणीस यांनी ती रक्‍कम स्विकारली होती. यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला होता. 

कमलाताईंची भेट

माजी उपमहापौर सुरेश नाशिककर आणि शाम सातपुते यांनी सांगितलेली ही आठवणही कमाल आहे. कमलाताई फडके भाजपच्या कार्यकर्त्या. शिवाजीनगर भागातील कार्यकर्त्यांची माता. त्यांची अटलजींवर अमाप श्रध्दा होती. अटलजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. वयोवृध्द कमलाताईंना अटलजींना पंतप्रधानाच्या खुर्चीत पाहायचे होते. त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. पंतप्रधानांची भेट अवघड असल्याची जाणीव कार्यकर्त्यांनी वारंवार करून दिली. परंतु ऐकतील तर त्या कमलाताई कसल्या. डेक्कन गावठाणातील कार्यकर्ते अ‍ॅड. सुरेश पायगंडे यांच्याबरोबर त्यांनी दिल्ली गाठली. कमलाताईंच्या या दौर्‍यासाठी कार्यकर्त्यांनी निधी जमा केला होता. तत्कालिन खासदार प्रदीप रावत यांच्या प्रयत्नातून कमलाताई पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्या खर्‍या पण एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय विषयात व्यस्त असल्याने अटलजींची भेट होणार नाही, असे सांगण्यात आले. खरं तर दोन दिवसांपासून अटलजींचा अन्य कोणाशीच संवाद होत नव्हता. परंतु कमलाताईंनी अटलजींना लांबून पाहाण्याची इच्छा व्यक्त केली. परवानगी मिळाल्यानंतर त्या अटलजींच्या दालनासमारे जाऊन उभ्या राहिल्या. अटलजींकडे पाहात त्या अत्यानंदाने जोरात ओरडल्या. आता मला मरायला काहीच हरकत नाही. त्यांच्या या रुपाकडे पाहून अतिशय गंभीर परिस्थितीत ही अटलजींना हसू आवरले नाही. त्यांनी त्यांना बोलावून घेतले. त्यांची विचारपूस केली. कमलाताईंना अत्यानंद झाला. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच आज भाजप सत्तेत आहे. 

राजकारणापासून विरंगुळा  

अटलजींना एकदा पुण्यातील सभेत भाषण झाल्यानंतर रात्री मी कारमधून श्रेयसवर परत आणित होतो. आमची गाडी बालगंधर्व रंगमंदिराजवळ आल्यावर ते अचानक म्हणाले की, इधर कौन सा नाटक चल रहा है. चलो हम देखेंगे. परंतु, त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले असल्याने ते शक्य नव्हते. नेहमीच्या धकाधकीला कंटाळून ते विरंगुळ्यासाठी अशा संधी शोधत असायचे.

...1984 चा पराजय 

इंदिराजींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला होता. अटलजी सुद्धा ग्वाल्हेरमधून पराभूत झाले होते. त्यानंतर जेव्हा ते पुण्यामध्ये आले होते. तेव्हा त्यांचे भाषण ऐकून जाणवले की, आपण उगाचच निराश होतो. अटलजींची निश्चिलता आणि खचून न जाता. सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा उमेदीने उभे राहण्याची क्षमता, खरोखरच अजोड होती. ते म्हणाले, ‘हम पराजय से कभी नाउम्मीद नही हूए, क्योंकी हमे विजय से कभी उन्माद नही आता!’ ‘राजनिती हमारे लिए एक साधन है, साध्य नही!’

..1970 सालचे ते भाषण

1970 सालच्या अटलजींच्या पुण्यातील भाषणाचे शब्द मला पाठ आहेत. ते म्हणाले होते, मुझे अभिमान है, मेरे हिंदुत्वका, मुझे अभिमान है की, हमारे ऋषी-मुनीयोंका, खून मेरी भी रगों मे बह रहा है, लेकिन मेरा हिंदुत्वही मुझे कहता है, कि उपासनापद्धती का भी आदर करो. सभी धर्म की मंजिले एक ही है. उधर पहुंचने के मार्ग भिन्न है!

‘पंडीतजी कुछ सुनाने का मिजाझ है क्या?’

ही फर्माइश आहे पहाडी आवाजाच्या पंडीतजींच्या गायकीच्या प्रेमात पडलेल्या अटलजींची! साधारणत: 15 वर्षापुर्वी अटलजी पंतप्रधान असताना पंडितजींनी शहरातील राजभवन येथे त्यांची भेट घेतली होती. यावेळी, त्यांनी पंडीजींकडे काही ऐकविण्याची विनंती केली. अटलींची केलेल्या विनंतीला पंडीतजींनी ‘जरूर’ अशी साद देत तात्काळ तंबोरे, पेटी आदी साहित्यांची जमवाजमव करून संगीत मैफल सजविली. पंडित भीमसेन जोशी हे अटल बिहारी वाजपेयी यांचे आवडते गायक होते. याखेरीज, त्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण बंधन होते. 

पंडित भीमसने जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी अटलजींच्या आणि भीमसेनजींच्या स्नेहपीर्ण संबंधांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, पंतप्रधान झाल्यानंतर एक ते दोन वर्षांनी वाजपेयी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेण्याचा योग आला. त्यावेळी, त्यांनी पंडीतजींशी जवळपास एक ते दीड तास चर्चा केली. अटलजी हे कवी असल्यामुळे त्यांना कलाकारांशी भेटण्याचा एक वेगळा आनंद मिळत असल्याचे दिसून येत होते. अटलजी उत्तम संवादक, सभ्य व सहिष्णु व्यक्तिमत्त्व होते. पंडित भीमसेन जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरातील रमणबाग प्रशालेत आयोजित कार्यक्रमास वाजपेयी यांनी हजेरी लावली होती. यावेळी, अटलजींच्या हस्ते पंडीतजींचा सत्कार करण्यात आला होता. सत्कार समारंभाबरोबर यावेळी वाजपेयींचे भाषणही झाले होते. यावेळी संगीताचा कार्यक्रमही पार पडला. तसेच, शिवाजीनगर येथील आर्य संगीत प्रसारक मंडळीच्या सवाई गंधर्व स्मारकाचे उद्घाटनही वाजपेयी यांच्या हस्ते पार पडले होते.

स्वयंसेवक म्हणून उपस्थिती...

अटलजींबद्दल आठवण सांगताना श्रेयस हॉटेलचे संचालक हनुमान चितळे यांनी सांगितले कि, मॉडर्न हायस्कूल जवळ संघाचे प्रांतसंघचालक बाबाराव भिडे यांचा बौद्धिक वर्ग सकाळी सात वाजता आयोजित केला होता. या वर्गास अटलजी स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते. आणि संघस्थानावर गटांमध्ये बसले होते. ही त्यांची स्वाभाविक वृत्ती होती. 

अटलजींचा मला जवळून परिचय झाला सन 1984 पासून. ऑक्टोंबर 84 मध्ये पुण्यात आमच्या श्रेयसच्या हॉलमध्ये भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक भरली होती. तीन दिवस अन्य सर्व नेत्यांसह त्यांचे वास्तव्य येथे होते. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. आम्ही त्यांना काय विचारावे? त्यांच्याशी काय बोलावे? असा प्रश्न पडे. परंतु कालांतराने असे लक्षात आले की, आपण घरच्या वडील मंडळींना जसे प्रश्न करू, तसेच अटलजींना काहीही विचारा; त्यांनी त्यात कधीही आमचा लहान तोंडी मोठा घास मांनला नाही. एव्हढेच नव्हे तर आमच्या सूचनाही ते ऐकून घेत. भेटायला येणार्‍या प्रत्येकाला ते न कंटाळता भेटत.

पायाला दुखापत तरीही...!

जनसंघाच्या पुण्यातील स्थापनेचा समारंभ 1952-53 मध्ये प्रभात टॉकीजच्या सभागृहात संपन्न झाला होता. त्या कार्यक्रमासाठी अटलजी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री साडे-आठच्या सुमारास जनसंघाचे कार्यकर्ते बाबुराव किवळकर यांच्या घरी जाण्यासाठी अटलजी निघाले असता त्यांना रिक्षासुद्धा मिळाली नाही. किवळकर आणि अटलजी पायी-पायी किवळकरांच्या घरी निघाले. त्यांच्या पायाला थोडी दुखापत झाली असल्यामुळे, किवळकरांच्या खांद्यावर हात ठेवून ते लंगडत घरी आले. किवळकरांच्या मातोश्रींनी दोघांनाही जेवायला बसवून चुलीवरच्या गरमा गरम भाकर्‍या करून वाढल्या होत्या. एखादे मोठे कार्य शुन्यातून कसे उभे राहते आणि कर्मठ व कठोर परिश्रमांनी अटलजींनी जनसंघ कसा वाढवला. याचे हे नमुनेदार उदाहरण आहे. पुढे 1960-70 च्या दरम्यान अटलजी पुण्यामध्ये गोपाळ ठाकूर यांच्या घरी उतरत असत. सन 1970 मध्ये महाराष्ट्र प्रदेश जनसंघाचे अधिवेशन पुण्यामध्ये भरले होते. जनसंघाचे बरेच प्रतिनिधी संघाचे स्वयंसेवक होते. या अधिवेशनासाठी जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अटलजी तीन दिवस उपस्थित होते.

मंगेशकर रुग्णालयाचे उद्घाटन

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्तेच शहरातील एरंडवणे परिसरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे 1 नोव्हेंबर 2001 रोजी उदघाटन झाले. त्यावेळी कार्यक्रमास त्यांच्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी, दिवंगत नेते प्रमोद महाजन, काँग्रेसचे दिवंगत नेेते विलासराव देशमुख आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी हे देखील उपस्थित होते. गानकोकिळा लता मंगेशकर यादेखील या कार्यक्रमास उपस्थित होत्या, अशी माहिती रुग्णालयाचे पब्लिक रिलेशन ऑफिसर शिरीश याडकीकर यांनी दिली. अटल बिहारी यांच्या जाण्याने तेथील वैद्यकिय संचालक डॉ. धनंजय केळकर, डॉक्टर, सर्व स्टाफ यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील पुस्तके

पुणे : रसिक साहित्यचे भरत दारवटकर म्हणाले, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अनेक लेखकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांना लोकांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला आहे.

मराठी भाषांमधील पुस्तकांविषयी दारवटकर म्हणाले, सारंग दर्शने यांचे अटलजी, ए. एस. दौलत यांचे काश्मीर वाजपेयी पर्व, ह. भी. चिकेरूर यांचे अटलजींच्या काही कविता, ललिता गुप्‍ते यांचे सौजन्यमूर्ती अटलजी, जयश्री देसाई यांचे राजयोगी नेता अटलजी, शकुंतला पुंडे यांचे मुलांचे अटलबिहारी, दत्ता टोळ यांचे आपले अटलबिहारी, विश्‍वास मेंहदळे यांचे पंडितजी ते अटलजी, रमेश मुधोळकर यांचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सु. बा. भोसले यांचे अटलबिहारी वाजपेयी, अनिता राजगुरू यांचे अटलबिहारी वाजपेयी, मोहिनी कडू यांचे अटलबिहारी वाजपेयी, ना. रा. खेकाळे यांचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी खंड 1 व खंड 2; तसेच नेताजी गायकवाड यांचे अटलबिहारी वाजपेयी ही काही महत्त्वाची पुस्तके उपलब्ध आहेत.

आपमेसे कोई चाय बना सकता है

पुणे : प्रतिनिधी

देशाचे माजी प्रंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अवघ्या देशाचे आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. देशातील सर्व विचारधारा आणि पक्षांच्या भिंती ओलांडून त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात पूजनीय स्थान मिळवले होते.

तो काळ 1981 चा  होता. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे सर्व विद्यार्थी अभ्यास दौर्‍यासाठी दिल्ली येथे गेले होते. तेथील अनेक संस्था, पार्लमेंट, लोकसभा, राज्यसभा, तसेच राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्त्वांच्या मुलाखती, भेटीगाठी असा कार्यक्रम खचाखच भरलेला होता, समवेत जेष्ठ पत्रकार गोपाळराव पटवर्धन, चंद्रकांत घोरपडे, विभाग उपप्रमुख प्र. ना. परांजपे उपस्थित होते. गोपाळराव व घोरपडे सरांमुळे आम्हाला अनेक मान्यवरांना लीलया भेटी मिळत होत्या. एक दिवस यूथ होस्टेलमध्ये सकाळी घोषणा झाली. आज सकाळी 11 वाजता वाजपेयींकडे भेटीसाठी जायचे आहे. 

आनंद गगनात मावेनासा झाला. भारतीय राजकारणातील एका अत्यंत अभ्यासू , उत्तुंग व्यक्तीमत्त्वाला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना भेटणार हेाते. पावसाळ्याचे दिवस होते. प्रत्येकी 15 मुले आणि मुली वाजपेयीजींच्या बंगल्यावर पोहचलो. त्यांच्या दिवाणखाण्यात कार्पेटवर बसलो. इतक्यात बाहेर जोरदार पावसाला सुरुवात झाली.  तेवढ्याते धोतर हातात धरत वाजपेयी स्थानापन्न झाले आणि गप्पा रंगू लागल्या.

कविता, साहित्य, बालपणाच्या आठवणी अशा अनेक विषयांवर चर्चा सुरू होती. पाऊस वाढतच होता. गारठलेली पामेरीयन श्‍वान एका सोफ्यावर पहुडले होते. तेवढ्यात अचानक वाजपेयी उठले बोलले और बोले, बच्चों, आज मेरी नौकरानी आई नही और बारिश बहुत है. तो मैं आपको चाय भी ऑफर नही कर सकता... रूककर बोले आपमेंसे कोई चाय बना सकता है क्या? सर्व मुली स्वयंपाक घराकडे धावल्या. वाजपेयींनी त्यांना खूणा करून चहा, साखर, दूध कोठे ठेवले हे दाखवले. मुलींनी चहा बनविला.  वाजपेयींच्या घरी पावसामुळे तब्बल तीन तास त्यांच्याबरोबर थांबण्याचे भाग्य आम्हाला लाभले. अशी माहिती विद्यार्थी युवराज शहा यांनी दैनिक ‘पुढारी’ला दिली. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील पुस्तके

पुणे : रसिक साहित्यचे भरत दारवटकर म्हणाले, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अनेक लेखकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांना लोकांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला आहे.

मराठी भाषांमधील पुस्तकांविषयी दारवटकर म्हणाले, सारंग दर्शने यांचे अटलजी, ए. एस. दौलत यांचे काश्मीर वाजपेयी पर्व, ह. भी. चिकेरूर यांचे अटलजींच्या काही कविता, ललिता गुप्‍ते यांचे सौजन्यमूर्ती अटलजी, जयश्री देसाई यांचे राजयोगी नेता अटलजी, शकुंतला पुंडे यांचे मुलांचे अटलबिहारी, दत्ता टोळ यांचे आपले अटलबिहारी, विश्‍वास मेंहदळे यांचे पंडितजी ते अटलजी, रमेश मुधोळकर यांचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सु. बा. भोसले यांचे अटलबिहारी वाजपेयी, अनिता राजगुरू यांचे अटलबिहारी वाजपेयी, मोहिनी कडू यांचे अटलबिहारी वाजपेयी, ना. रा. खेकाळे यांचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी खंड 1 व खंड 2; तसेच नेताजी गायकवाड यांचे अटलबिहारी वाजपेयी ही काही महत्त्वाची पुस्तके उपलब्ध आहेत.