Wed, Jul 24, 2019 12:46होमपेज › Pune › एसटी स्थानकांत ‘मेडिकल’ कधी? 

एसटी स्थानकांत ‘मेडिकल’ कधी? 

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMपुणे : निमिष गोखले

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्थानकांवर प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी परियोजनेंतर्गत पुण्यासह राज्यातील 568 एसटी स्थानकांवर स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. परंतु, त्या उपक्रमाच्या निविदांना प्रतिसादच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यासह पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पिंपरी-चिंचवड आदी एसटी स्थानके जेनेरिक औषधांच्या प्रतीक्षाच करावी लागेल.

केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात औषधांचा पुरवठा करण्याच्या हेतूने जेनेरिक औषधांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. दि. 27 डिसेंबर 2016 मध्ये याबाबत परिवहन मंत्री  दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि भारत फार्मा सार्वजनिक क्षेत्र यांच्यात स्थानकांवर स्वस्त औषधे दुकान सुरू करण्याबाबत सामंजस्य करार केला होता. परंतु, दीड वर्षानंतरही या कराराची अमलबजावणी होऊ शकली नसून, हा उपक्रम कागदोपत्रीच अडकल्याचे सद्यःस्थितीवरून दिसून येते.  

दोन वेळा निविदा काढून प्रतिसाद न मिळाल्याने एसटी महामंडळ तिसर्‍यांदा निविदा काढणार असल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, हा उपक्रम सुरू झाल्यास गरीब रुग्णांना याचा निश्‍चितच फायदा होणार असून औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. 

जेनेरिक औषधांची किंमत कमी का? 

जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने पेटंटच्या कालावधीत वसूल केलेला असतो. अर्थातच औषधनिर्मितीचा खर्चही कमी असल्याने त्याची किंमत मूळ ब्रँडेड औषधांपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक कमी असते. यामध्ये पैशांची बचत आणि उपचारही उच्च दर्जाचा असतो. उदा. डोकेदुखी, ताप, अंगदुखी यांपासून आराम देणारे ‘पॅरासिटॅमॉल’ नावाचे एक औषध आहे. ‘पॅरासिटॅमॉल’ हे जेनेरिक नाव झाले. तर क्रोसिन, मेटॅसीन आदी ब्रँडेड औषधे आहेत. ही जी निरनिराळ्या ब्रँडनेमखाली मिळतात. त्यांना ‘ब्रँडेड-जेनेरिक’ असे म्हणतात. भारतात सुमारे एक हजार जेनेरिक औषधांपासून बनलेली पन्नास हजार ब्रँडेड-जेनेरिक औषधे आज भारतात विकली जातात. पेटंटचा कालावधी दहा ते वीस वर्षांदरम्यान असतो. या कालावधीनंतर इतर औषध कंपन्या त्या कंपनीचा फॉर्म्युला वापरून व तिच्या परवानगीशिवाय त्याच गुणवत्तेचे औषध वेगळ्या नावाने म्हणजेच जेनेरिक नाव देऊन तयार करू शकतात. हे तयार केलेले औषध म्हणजेच ‘जेनेरिक औषध’ असते. 

किचकट अटींमुळे प्रतिसाद नाही

नियम व अटी किचकट असल्याने निविदेला म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे उत्तर पुणे विभागातील एसटीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिले आहे. परंतु, या जाचक अटी, नियम काही दिवसात शिथिल केल्या जातील. त्यानंतर निविदेला प्रतिसाद मिळण्याची आशा आहे, असेही त्या अधिकार्‍याने सांगितले आहे.