Sat, Dec 07, 2019 15:29होमपेज › Pune › वार्ताहराला मारहाण करणे भोवले

सहायक आयुक्त मोरेंची बदली

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 1:10AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

एका वृत्तपत्राच्या वार्ताहराला मारहाण  केल्याप्रकरणी वानवडी विभागाचे सहायक आयुक्त  नीलेश मोरे यांची बदली करण्यात आली. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश दिले.  दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सकाळी पोलिस आयुक्त शुक्ला यांची भेट घेऊन कारवाई करण्याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले होते. 

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. शनिवारी (दि. 16 डिसेंबर) मांजरी येथील शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारात सुरू असलेल्या आंदोलनाच्या वार्तांकनासाठी संबंधित वार्ताहर गेला होता. त्यावेळी वार्ताहराने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले. मात्र, बंदोबस्तावर असणारे सहायक आयुक्त नीलेश मोरे यांनी वार्ताहराला मारहाण करत गाडीत डांबून पोलिस ठाण्यात नेले.

तसेच मोबाईल घेऊन केलेले रेकॉर्डिंग डिलीट केले. त्यानंतर त्यांच्याकडून माफिनामा लिहून घेण्यात आला. दरम्यान, या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येत होता.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. तसेच घटनेची सविस्तर माहिती त्यांना देऊन कडक कारवाई करण्याचे निवेदन दिलेे.  त्यानुसार नीलेश मोरे यांची तात्पुरत्या स्वरूपात विशेष शाखा विभाग दोनमध्ये बदली करण्यात आली आहे.  तर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांच्याकडे वानवडी विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.