Tue, Nov 19, 2019 11:20होमपेज › Pune › विधानसभा निवडणूक १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान : चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणूक १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान : चंद्रकांत पाटील

Published On: Jun 25 2019 4:53PM | Last Updated: Jun 25 2019 4:53PM

संग्रहित छायाचित्रपिंपरी : प्रतिनिधी

राज्यात येत्या १५ सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसिंहता लागण्याची शक्यता असल्याचे सांगत ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असं भाकीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मोरीवाडी, पिंपरी येथील भाजपा पक्ष कार्यालयात आज, मंगळवारी (दि.२५) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

यावेळी बोलताना महसूल मंत्री पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशाच्या नागरिकांचे मावळ लोकसभा निवडणुकीकडे लक्ष लागले होते. त्यामध्ये आपण यश संपादन केले आहे. त्याबद्दल तुमचे आम्ही शतशः आभारी आहे. परंतु बारामतीमध्ये विजयी होऊ शकलो नाही. मी पालकमंत्री झाल्यामुळे पंधरा दिवसातून बारामतीला जाऊन तेथील अडीअडचणी सोडविणार आहे. २०१९ च्या विधानसभेला अजित पवार यांना हरविण्याचे आमचे उदिष्ट आहे. परंतु प्रॅक्टीकली ते सहज शक्य नसले तरी तो आशावाद निश्‍चित असल्याचे ते म्हणाले. तर आमचे ध्येय बारामती लोकसभा २०२४ ची निवडणूक आहे. काही झाले तरी निश्‍चित बारामतीमध्ये कमळ फुलविण्याचा आमचा मानस असल्याचेही ते म्हणाले. 

याबरोबरच लोकसभेच्या यशाने हुरळून जाऊ नका म्हणत कार्यकर्त्यांना ओडिशा राज्याचे उदाहरण त्यांनी  दिले. ओरिसामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या. मात्र लोकसभेला भाजपाच्या आठ जागा निवडून आल्या असताना विधानसभेला ९४ जागापैकी फक्त २० जागांवरच समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री बिजू पटनाईक हे पंचवीस वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी केलेल्या कामामुळे ते वारंवार यशस्वी होत आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभेसाठी जमिनीवर राहून काम करा. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आपण २२८ जागांवर पुढे आहे. त्यामध्ये ९९ जागांवर तर आपला विजय निश्‍चितच आहे. इव्हेंट निवडणुकांचे महत्व संपले आहे. पैसे वाटून आपण जिंकून येऊ शकतो हा राष्ट्रवादीचा विश्वास तुम्हीच मावळच्या निवडणुकीत  खोटा ठरविला आहे. त्यामुळे लोकांच्यात मिसळा. त्यांच्या कामांना प्राधान्य द्या, निश्‍चित आपण विधानसभेसाठी ठेवलेले ध्येय गाठू शकतो असा विश्वास देखील पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आ. महेश लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, पक्षनेता एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, प्रदेश चिटणीस उमा खापरे उपस्थित होते. 

अजितदादा तुरुंगात जातील का हे सांगायला मी ज्योतिषी नाही

जलसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना जेलमध्ये टाकण्यात येईल असे भाजपाचे नेते सांगत होते. त्याबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना अटक करण्यात येईल का असा प्रश्‍न विचारला असता ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यांना अटक होणार की नाही, हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या अटकेवर बोलणे टाळले.

युतीच्या जागा वाटप फॉर्म्युल्यात मागे-पुढे होऊ शकते

भाजपा-शिवसेनेमध्ये २५ वर्षापासून युती आहे.  जागा वाटपात भागिदारी आणि सत्तेमध्ये ५०-५० टक्के जागा हा युतीचा गाभा आहे. शिवसेना किंवा भाजपाचे कार्यकर्ते अनेक वर्षे काम करीत आहेत. कोणाला लढायचे असेल तर ते लढतात, कोणी बंड करतात तर काहीजण शांत राहतात. युतीमध्ये समजदारी वाढू लागली आहे. त्यामुळे जागावाटपात मागे-पुढे होऊ शकते असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

आ. जगताप आणि आ. लांडगे यांना योग्यवेळ आल्यावर संधी मिळणार

भाजपा हा पक्षसंघटनेवर चालणार पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या कामाची नोंद होत असते. १० हजार डोळे आणि २० हजार कान प्रत्येकजण काय करतोय हे टिपण्याचे काम करत आहेत. आ. लक्ष्मण जगताप आणि आ. महेश लांडगे यांच्या कामाची नोंद पक्षाने घेतली आहे. पुणे जिल्ह्यात वर्षानुवर्षे ग्रामीण भागाला मंत्रीपद मिळावे ही मागणी होती. त्यामुळे बाळा भेगडे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आ. जगताप आणि आ. लांडगे यांना योग्यवेळ आल्यावर निश्‍चित संधी मिळणार आहे, असे ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवडच्या प्रश्‍नांचा आढावा घेणार

पालकमंत्री या नात्याने पिंपरी-चिंचवड मधील प्रश्‍नांबाबत महापालिका प्रशासनाकडून माहिती घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे. आदर्शवाद आणि विकासाच्यादृष्टीने मी काम करतो. त्यामुळे विकासात्मक दृष्टीने अभ्यास करून त्याबाबत आदर्श तयार करून ते प्रश्‍न विधानसभेत मांडणार.