Sun, Jul 21, 2019 15:09
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › उद्योगनगरीत विठूनामाचा गजर

उद्योगनगरीत विठूनामाचा गजर

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:53PMपिंपरी : प्रतिनिधी 

आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय झाला होता़मोहननगर, चिंचवड, निगडी, दापोडी येथील विठ्ठल मंदिरात रिमझिम पावसातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या़ याशिवाय, शहरातील विविध शाळा, नर्सरीतील  विद्यार्थ्यांनी संत-महात्म्यांची वेशभूषा परिधान करून देखाव्यांसह मुख्य रस्त्यांवरून पालखीसह चित्तवेधक मिरवणुका काढल्या होत्या. दरम्यान मंदिरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  

ज्या लोकांना आषाढीनिमित्त दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नाही ते सर्व भाविक आज या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात. संपूर्ण मंदिर परिसर राम कृष्ण हरी या महामंत्राने दुमदुमून गेला होता. आषाढी एकादशीला विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पंढरपूरला धाव असते़  काही भाविक आपल्या शहरातील, परिसरातील विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेऊन समाधान मानतात़  आज सकाळपासूनच शहरातील विठ्ठल मंदिरात आबालवृध्दांनी दर्शनासाठी रांग लावली होती़  विठ्ठल- विठ्ठल जय हरी असा जयघोष करीत भाविकांनी विठ्ठल- रुक्मिणीची मनोभावे दिवसभर पूजा करुन दर्शन घेत होते़  मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असल्याने वातावरणही भक्तिमय झाले होते़ मंदिर परिसरात पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली होती़  काही शाळेना सुट्टी असल्याने बालकांसह ज्येष्ठ मंडळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांत तल्लीन झाल्याचे दिसून येत होते़  शहरातील विविध विठ्ठल मंदिरात प्रसादाचे वाटप करण्यात आले.

शाळांचीही दिंडी 

आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध शाळांच्या वतीने दिंडी काढण्यात आली़  छोट्या बालकांनी कपाळी उभा गंध, त्यामध्ये बुक्का, दोन्ही कान व गालास पांढरा गंध लावून दिंडीत सहभाग घेतला होता़  काही चिमुकल्यांच्या हाती टाळ, चिपळ्या तर काहींच्या हाती वीणा तर काहींच्या हाती मृदंग होते़  टाळ, मृदुंग, चिपळ्या आणि वीणेच्या गजरात वारकर्‍यांची वेशभूषा परिधान केलेली बालके विठ्ठल विठ्ठल जय हरी असा जयघोष करीत होते़  सकाळपासूनच विद्यार्थ्यांची ही लगबग सुरु असल्याचे पहावयास मिळाली.