होमपेज › Pune › अपशकुनी म्हणून पत्नीला नाकारले  

अपशकुनी म्हणून पत्नीला नाकारले  

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

समाजातील अनिष्ठ प्रथा, रुढी आणि अंधश्रद्धेला मुठमाती देण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य वेचले, तर काहींनी प्राणांची आहुती दिली, मात्र, या गोष्टी नष्ट होण्याचे नाव घेत नाहीत. विवाहानंतर आठवडाभरात लष्करात लान्स नायक म्हणून कार्यरत असलेल्या पतीचा अपघात झाल्याने पांढर्‍या पायाची, अपशकुनी म्हणून नाकारलेली माऊली गेली सात वर्षे न्यायासाठी धडपडत आहे.

मावडी पिंपरी, पुरंदर येथील सारीका (नाव बदलले आहे) यांचा विवाह त्या बीएससीचे शिक्षण सुरू असतानाच सन 2010 मध्ये लष्करात लान्स नायक पदावर कार्यरत असलेल्या वडगांव निंबाळकर,बारामती येथील मनोज (नाव बदलले आहे) यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सारीका या हळद उतरण्यासाठी म्हणून माहेरी आल्यानंतर पती मनोजचा अपघात झाला. विवाहानंतर काही दिवसातच अपघात झाल्याने सासरच्या मंडळींकडून पांढर्‍या पायाची, अपशकुनी म्हणून सारिकाला अपघाताची माहिती देण्यात आली नाही. 

सासरी निरोप पाठवूनही घेण्यास कोणी येत नसल्याने एका महिन्याने सारिका व त्यांचे आई, वडील स्वतः होऊन सासरी गेले. मात्र, सासरच्या मंडळींनी सारिका व मनोजची भेट होऊ दिली नाही. त्यानंतरही सारिका बळजबरीने सहा महिने सासरी राहिल्या. या कालावधीतही सासरच्या मंडळींनी पती मनोजची भेट होऊ दिली नाही. त्यामुळे सारिका या नाईलाजाने पुन्हा माहेरी परतल्या. 

त्यानंतर मनोजने बारामती न्यायालयात सारिका यांच्यापासून घटस्फोट मिळण्यासाठी 2015 साली दावा दाखल केला. यामध्ये न्यायालयाने महिना दीड हजार रुपये सारिका यांना पोटगी देण्याचा आदेश मनोजला दिला. तेव्हापासून आजतागायत मनोज यांच्याकडून पोटगीची रक्कम सारिका यांना देण्यात आली नसल्याचे सारिका व त्यांच्या आईंनी सांगितले. मनोज यांनी लष्करी दप्तरामध्ये आपला विवाह झाल्याने न सांगता आईस वारसदार म्हणून दाखविल्याचे सारिका यांनी सांगितले. मनोज हे खडकी येथे कार्यरत असताना सारिका आणि त्यांच्या आईंनी त्यांना व त्यांच्या अधिकार्‍यांना भेटण्याचा प्रयत्न केल्यानंतर मनोज यांनी आपली बदली आसाम येथे करून घेतल्याचेही सांगण्यात आले. सारिका व त्यांच्या आई,वडिलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून, त्यांना फक्त दोन एकर जमीन आहे. एक भाऊ आहे तो स्वतःचा संसार आणि विवाहासाठी काढलेले कर्ज फेडत आहे. त्यामुळे तो आई-वडील आणि बहिणीकडे म्हणावे तेवढे लक्ष देत नाही. 

शेतात काम करून आई मुलीचा व आपला उदरनिर्वाह भागवते. सारिका आणि त्यांच्या आईंनी अ‍ॅड. सुप्रिया कोठारी यांच्यामार्फत न्याय मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मनोजसोबत विवाह झाल्याचे फोटो, विवाह पत्रिका हे पुरावे घेऊन या माय,लेकींची धडपड सुरू असून, मनोजची वारसदार म्हणून नोंद होण्यासाठी आणि पुन्हा सासरचे जवळ करतील, या आशेवर दोघीही धावपळ करत आहेत.