Fri, Jan 18, 2019 12:54होमपेज › Pune › अरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

अरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 1:18AMपुणे : प्रतिनिधी

कुख्यात गुंड अरुण गवळी याची पत्नी मम्मी ऊर्फ आशा गवळी हिला मंचर पोलिस ठाण्यातील  खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने विविध अटींवर 30 हजार रुपयांच्या जातमुचल्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांनी हा आदेश दिला आहे.  दरम्यान, मम्मी हिच्यावर अशा प्रकारचा आणखी एक गुन्हा मंचर पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्यामध्येही तिला तात्पुरता अटकपूर्व मिळाला आहे. 

याबाबत चंदननगर येथील एका व्यापार्‍याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सुरज यादव (लोणी धामणी, ता. आंबेगाव), मोबीन मुजावर (रा. मुंबई) आणि बाळा पठारे (रा. वाघोली) आणि अन्य एका व्यक्तीवर प्रकरणात गुन्हा दाखल आहे. यादव, मुजावर आणि पठारे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ते तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. ही घटना 13 ते 16 एप्रिल या कालावधीत घडली. फिर्यादी यांचे चंदननगर येथे ड्रायफूडचे दुकान आहे. याबरोबरच लोणी धामणी येथे एक दुकान आहे. तेथे त्यांच्या भावाचे कपड्याचे दुकान आहे.

ही तिन्ही दुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी 5 लाख रुपयांच्या खंडणीची फिर्यादींच्या मोबाईलवर फोन करून मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास दुकानाची मोडतोड करण्याची आणि जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यातही प्रत्यक्ष मम्मीने फोनवरून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात मम्मीने अ‍ॅड. पी. बी. बिराजदार, अ‍ॅड. नितीन शिंदे, अ‍ॅड. सुरेश जाधव आणि अ‍ॅड. दर्शन वाठोरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. बचाव पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने मम्मी हिला विविध अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 

पोलिस बोलावतील त्यावेळी पोलिस स्टेशनला हजेरी लावणे, तपासाला सहकार्य करणे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, फिर्यादी, साक्षीदारांवर दबाब टाकायचा नाही, सध्याचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक तपास अधिकार्‍यांना देणे, तपास अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र न सोडणे, जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा न करणे, या अटीवर या गुन्ह्यात 30 हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.