पुणे : प्रतिनिधी
शहरात ठिकठिकाणी असलेल्या फळविक्रेत्यांकडून कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे विकण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेरू, केळी, सीताफळे यांचा समावेश आहे. या फळांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, त्यांच्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए)ची कारवाई होणे गरजेचे आहे.
शहरातील मार्केटयार्ड परिसर, दुसर्या शहराला जोडणारे महामार्ग, पुणे-मुंबई रस्ता, सिंहगड रस्ता, (राजाराम पुलाच्या पुढे), भाजी मंडई आणि शहरात असणार्या स्टॉलवर ही फळांची विक्री होते. यामध्ये फळांचे स्टॉल, मंडई यामध्ये फळांची गुणवत्ता योग्य असल्याची दिसून येते; पण रस्त्याच्या कडेला असलेल्या फळविक्रेत्यांकडे कृत्रिमरीत्या फळे पिकविल्याचे आढळून येत आहेत.
राजाराम पुलाच्या पुढे सिंहगड रस्त्याच्या कडेला अनेक फळेविक्रेते तेथून एका ग्राहकाने पेरू विकत घेतले होते. परंतु ते खाल्यानंतर कडवट लागल्याने ते केमिकल किंवा कार्बाईड टाकून पिकविली आहेत का, याची शंका उत्पन्न होत आहे. हाच प्रकार केळी, मोसंबी, सीताफळे यांच्या बाबतीतही होताना दिसून येत आहे. अशी फळे आढळल्यास नागरिकांनी त्वरित एफडीएला कळवावे. त्यांची तक्रार केली असता एफडीएकडून फळविक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीएचे सहायक आयुक्त संपत देशमुख यांनी दिली.
इथिलीन गॅस 100 पीपीएम या प्रमाणात देऊन सध्या केळी पिकविली जाते आणि त्याला एफडीएची परवानगीदेखील आहे. पण, कार्बाईड टाकून किंवा इतर अशास्त्रीय पध्दतीने फळे पिकविणे आणि त्याची विक्री करणे हा गुन्हा आहे. विविध पदार्थ टाकून पिकविलेली फळे खाल्यास उलटी, मळमळ, पोटदुखी आदी स्वरूपाचे त्रास होतात. हे लगेच दिसून येणारे परिणाम असले तरी त्याचे दूरगामी परिणाम होतात. यामध्ये कॅन्सर होण्याचाही धोका अधिक असल्याचे डॉक्टर, आहारतज्ज्ञ सांगतात.