Tue, Feb 19, 2019 20:24होमपेज › Pune › कला शिक्षकांना डी.एल.एड.पदविकेची आवश्यकता नाही

कला शिक्षकांना डी.एल.एड.पदविकेची आवश्यकता नाही

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:28AM

बुकमार्क करा
पुणे :

राज्यातील ज्या कला शिक्षकांनी कला शिक्षक प्रशिक्षण (ए.टी.डी) केले आहे. अशा शिक्षकांनी डी.एल.एड. ही पदविका पूर्ण करणे आवश्यक आहे का, अशी विचारणा राज्य कला संचालनालयाकडे पुणे जिल्हा कला शिक्षक संघ आणि व्हीजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ या संघटनांनी केली होती. त्यावर राज्य कला संचालनालयाने कला शिक्षकांना डी.एल.एड.ची आवश्यकता नसल्याची माहिती देत महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाला यासंदर्भातील परिपत्रक काढण्याच्या सूचना कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिल्या आहेत.

पुणे जिल्हा कला शिक्षक संघ आणि व्हीजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ यांनी डी.एल.एड. संदर्भात विचारलेल्या माहितीबाबत मार्गदर्शन करताना राज्याचे कला संचालक राजीव मिश्रा म्हणाले, कला शिक्षक प्रशिक्षण हा अभ्यासक्रम बारावीनंतर दोन वर्षांचा पूर्णकालिक अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात कलाविषयक सर्व प्रात्यक्षिके व सैद्धांतिक विषयामध्ये भारतीय कलेचा इतिहास, शैक्षणिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, शालेय संघटन व प्रशासन, पाठाचे टाचण तसेच पाठाचे निरीक्षण प्रकल्पांसह अभ्यासक्रमात समावेशित करण्यात आले आहे.

तसेच कला विषयांशी संबंधित सर्व विषयांसह ए.टी.डी.धारक विद्यार्थी प्रशिक्षणासह उत्तीर्ण होतो. त्यामुळे ए.टी.डी.धारक अप्रशिक्षित नसून प्रशिक्षित शिक्षक आहे. त्यामुळे  त्यांना डी.एल.एड ही पदविका पूर्ण करणे आवश्यक नाही. तशा प्रकारचे परिपत्रक प्राधिकरणाने काढावे, अशी विनंती देखील मिश्रा यांनी केली आहे. यासंदर्भात प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.