Tue, Mar 19, 2019 03:09होमपेज › Pune › भरदिवसा मध्यवस्तीतील ‘ज्वेलर्स’वर सशस्त्र दरोडा 

भरदिवसा मध्यवस्तीतील ‘ज्वेलर्स’वर सशस्त्र दरोडा 

Published On: Feb 22 2018 1:24AM | Last Updated: Feb 21 2018 11:39PMपुणे : प्रतिनिधी

शहरात मध्यवस्तीत असणार्‍या रविवारी पेठेतील सराफी दुकानावर भरदिवसा पाच जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना बुधवारी घडली. दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवत दुकानातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दीड कोटींचा ऐवज लंपास केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतिचे वातावर निर्माण झाले होते.  याप्रकरणी याप्रकरणी मनोज जैन (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फरासखाना पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेतील 448 येथील यात्री हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत लॉईन एडमन फॅरो (वय 35) यांचे पायल गोल्ड हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. फिर्यादी मनोज जैन हे फॅरो यांचे मेहुणे आहेत. त्यांच्या दुकानात कामासाठी दोन नोकर आहेत. दरम्यान जैन हे दुपारनंतर दुकानात येतात. तर, फॅरो हे सकाळी दुकानात असतात. 

बुधवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जैन हे दुकानात एकटेच होते. दुकानात कामाला असणारे दोन नोकर जेवण्यासाठी गेले होते. त्याचवेळी चार दरोडेखोर हातात कोयते घेऊन दुकानात शिरले. तर एकजन दुकानाच्या बाहेर थांबला. आत शिरलेल्या चौघांनी दुकानाचे शटर बंद केले. तसेच, जैन यांना शिवीगाळ करत कोयत्याचा धाक दाखवून आरडा-ओरडा करू नको, अशी धमकी दिली. तसेच, इतरांनी दुकानातील काऊंटरच्या काचांमध्ये ठेवलेले 70 तोळ्याहून अधिक सोन्याचे दागिने तसेच 35 हजार रुपयांची रोकड असा सुमारे दीड कोटींचा ऐवज चोरून नेला. हा सर्व प्रकार केवळ काही मिनिटांमध्ये घडला. चोरटे सोने घेऊन पसार झाले.

त्यानंतर जैन हे दुकानातून बाहेर आले आणि त्यांनी आरडा-ओरडा केला. त्यावेळी येथील परिसरात घडलेला प्रकार समजला. अचानक भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणीच हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ फरासखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. फरासखाना पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. भरवर्दळीच्या वेळी एका सराफी दुकानात शिरून दरोडा पडल्याने शहरात मोठी खळबळ माजली होती. दरम्यान या घटनेची माहिती वार्‍या सारखी पसरली. त्यामुळे परिसरातील अनेकांनी याठिकाणी धाव घेतली होती. त्यामुळे येथे मोठी गर्दी झाली होती. मात्र, मध्यवस्थीतच ही घटना घडल्याने परिसरातील व्यापार्‍यांच्या मनांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

दरम्यान सराफी दुकानात सीसीटीव्ही आहेत. परंतु, ते कार्यरत नाहीत. मात्र, परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. त्यानुसार, त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हीआयपींच्या बंदोबस्तात वरिष्ठ 

शहरात वेगवेगळ्या निमित्त्ताने केेंद्रासह राज्यातील काही मंत्री तसेच व्हीआयपी आले होते. सायंकाळपयर्र्ंत ते पुण्यात असल्याने वाहतूक पोलिसांसह सस्थानिक पोलिस बंदोबस्तात होते. त्यासोबतच वरिष्ठही याच बंदोबस्तावर नजर ठेवून होते. त्यातच मध्यवस्थीत दरोडा पडल्याने स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची मोठी धावपळ उडाली. परिमंडळ एकचे उपायुक्क्त डॉ. बसवराज तेली यांच्यासह वरिष्ठांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.