Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Pune › सशस्त्र सेना देशासाठी समर्पणाचे प्रतीक : राष्ट्रपती

सशस्त्र सेना देशासाठी समर्पणाचे प्रतीक : राष्ट्रपती

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 31 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी 

एक सैनिक किंवा सैन्यातील अधिकारी, मग तो पायदळ, वायूदल, किंवा हवाई यापैकी कोणत्याही दलातील असो, त्याच्याबाबत नागरिकांमध्ये एक प्रकारची आत्मीयता व विश्‍वास असतो. एका सैनिकाबद्दल बोलताना सामान्य माणसाचा ऊर नेहमीच अभिमानाने भरून येतो. सशस्त्र सेना भारतीय संस्कृतीचे सर्वोत्तम दर्शन घडवते. सशस्त्र सेना देशासाठी श्रेष्ठत्वाचे, समर्पणाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) 134 वा दीक्षान्त समारंभ बुधवारी (दि. 30) मोठ्या उत्साहात पार पडला, या वेळी ते बोलत होते. राष्ट्रपती पुढे म्हणाले की, या दीक्षान्त समारंभात देशातील सर्व भागातील, समुदायातील छात्र सहभागी होतात. देशाची एकता यातून दिसून येते. सशस्त्र सेनेची खरी ओळख व त्यांना जवळून पाहण्याची संधी मला देशाचा राष्ट्रपती झाल्यावरच मिळाली. 

दिल्लीबाहेरील माझा पहिला दौरा लडाख येथे होता. त्यावेळी शूरवीर  सैनिकांसोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली. तसेच त्यांना जवळून न्याहाळता आले. सशस्त्र दल केवळ नोकरी करण्याकरिता नाही ते प्रतिउत्तर देण्याबाबत आहेत. आणि हे प्रतिउत्तर मनुष्य दुर्मिळ प्रजननाच्या भल्यासाठी आहे. 

एनडीएतील छात्रांना उद्देशून राष्ट्रपती म्हणाले, ‘सेवा परमो धर्म’ हे एनडीएचे बोधवाक्य असून, त्यातून तुम्हाला नक्कीच धैर्य मिळेल. हे बोधवाक्य कायम तुमच्या हृदयात साठवून ठेवायला पाहिजे. हे तीन शब्द  कायम स्मरणात ठेवलेत तर शत्रूशी लढण्यास दुप्पट बळ मिळेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, या तुकडीतून 344 छात्र उत्तीर्ण झाले असून, यामध्ये 238 छात्र सैन्य दल, नौदलातील 26 कॅडेट आणि वायु दलाचे 80 छात्र आहेत. यामध्ये मैत्रीपूर्ण परदेशी देशातील 15 छात्र देखील समाविष्ट आहेत. हे सर्व अफगाणिस्तान, भुतान, मालदिव, कझाकिस्तान आणि ताजिकिस्तान येथील आहेत. 

संपूर्ण तुकडीमध्ये प्रथम क्रमांक बटालियन कॅडेट कॅ. अक्षत राज यांनी मिळवून राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळविले. दुसरा क्रमांक कॅ. मोहम्मद सोहेल इस्लामने मिळविला व रौप्यपदक पटकाविले. तिसरा क्रमांक स्क्‍वॉड्रन कॅप्टन अली अहमद चौधरी याने मिळवून कांस्य पदक जिंकले. प्रतिष्ठेचे समजले जाणारे चीफ ऑफ स्टाफ बॅनर किलोज स्क्‍वॉड्रनने पटकाविला. त्यांनीच आजच्या कवायतकरिता चॅम्पियन स्क्‍वॉड्रन म्हणून काम पाहिले.

आई-वडिलांसमोर झालेला सन्मान लाख मोलाचा : जी. के. रेड्डी

मोठे होऊन फायटर पायलट व्हायचे, असे मी मनाशी पक्के ठरवले होते. वडील लष्करात असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा मला खूप फायदा झाला. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी एनडीएमध्ये दाखल झालो. परंतु आजचा क्षण आनंदाचा असून, आई-वडिलांसमोर झालेला सन्मान माझ्यासाठी लाख मोलाचा आहे, अशा शब्दात शैक्षणिक कामगिरीत सर्वोत्तम ठरलेला एनडीएचा छात्र जी. के. रेड्डी याने आपल्या भावना व्यक्त केल्या. रेड्डी हा मूळचा आंध्र प्रदेशातील आहे.

अ‍ॅडमिरल ट्रॉफी पटकावलेला एस. एस. बिष्ट म्हणाला की, माझ्या घरामध्ये कुणाचाही लष्कराशी संबंध नाही. तरीदेखील मला लष्करात दाखल व्हायचे होते. एनडीएमध्ये शिक्षण घेण्याचा माझा निर्धार होता. त्यानुसार मी परीक्षेची जय्यत तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भविष्यात लष्कराच्या पॅराकमांडो फोर्समध्ये जाण्याची माझी तीव्र इच्छा आहे. बिष्ट हा मूळचा उत्तराखंड राज्यातील आहे. दरम्यान, यंदाच्या निकालात लष्कराशी संबंध नसलेल्या कुटुंबातील छात्रांनी बाजी मारल्याचे दिसून आले.