Mon, May 27, 2019 01:12होमपेज › Pune › सौरऊर्जा निर्मिती, ई-लर्निंग, बायसिकल शेअरिंगला मंजुरी

सौरऊर्जा निर्मिती, ई-लर्निंग, बायसिकल शेअरिंगला मंजुरी

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 1:17AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात एरिया बेस डेव्हल्पमेंट प्रकल्पाअंतर्गत (एबीडी) सौरऊर्जेची निर्मिती, पालिकेच्या शाळांत ई-लर्निंग आणि पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यास पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्यता देण्यात आली. मंडळाची चौथी सभा सोमवारी (दि.30) आयुक्त दालनात झाली. अध्यक्षस्थानी डॉ. नितीन करीर होते. यावेळी महापौर नितीन काळजे, मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायीच्या अध्यक्षा ममता गायकवाड,  प्रमोद कुटे, पोलिस अधिकारी अशोक मोराळे, पीसीएससीएलचे आर. पी. सिंग, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी राजेश लांडे उपस्थित होते. 

पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या दोन भागांत प्रायोगिक तत्वावर पब्लिक बायसिकल शेअरींग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 4 कंपन्यांसोबत करार करण्यात येणार आहे. शहरात 3 ठिकाणी सौर ऊर्जा पॅनेल बसविण्यात येणार आहेत. प्रकल्प 30 जूनअखेरीस कार्यान्वित केला जाणार आहे. पालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे; तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी हर्डीकर यांना 1 कोटीपर्यंत खर्चाच्या निर्णयाचे अधिकार प्रदान करण्यात आले.  स्मार्ट सिटीसाठी स्वंतत्र अधिकारी व कर्मचार्‍यांचे संख्येबाबत स्वतंत्र धोरण आखण्यात येणार आहे. या निर्णयांना सभेने मान्यता दिली. पॅन सिटी प्रकल्पातील सिटी नेटवर्क, सिटी वायफाय, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, स्मार्ट ट्राफीक, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट लाईट, सोशल मीडिया अ‍ॅनेलिस्टीक्स आदी कामांच्या आराखड्यास (डीपीआर) सभेने मान्यता दिली.

प्रकल्प समितीवर कुटे, चिखले

स्थायीच्या अध्यक्ष ममता गायकवाड यांची संचालक मंडळाच्या संचालकपदी निवड करण्यात आली. मंडळाच्या प्रकल्प समितीवर शिवसेनेचे प्रमोद कुटे व मनसेचे सचिन चिखले यांनी निवड करण्यात आली. या समितीवर दोघांचा समावेश नसल्याने टीका करण्यात आली होती. अखेर दोघांचा समावेश केला गेला. 

Tags : Pimpri, Approval, solar energy, generation, e learning, biological, sharing