Mon, Jun 17, 2019 18:36होमपेज › Pune › सहा मेट्रो मार्गांच्या आराखड्यास मंजुरी

सहा मेट्रो मार्गांच्या आराखड्यास मंजुरी

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरात वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्याची घाई सुरू झाली आहे. गेल्या महिनाभरात स्थायी समितीने जवळपास सहा मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर आराखडा (डीपीआर) करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मेट्रोमार्ग आपल्याच भागातून गेला पाहिजे, यासाठी सत्ताधारी नगरसेवकांत चढाओढ सुरू आहे.

शहरातील वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, या दोन्ही मार्गाचे डीपीआर करण्यापासून त्याची मंजुरी आणि प्रत्यक्ष कामास सुरवात होण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनंतर सहा महिन्यांपूर्वी स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा डीपीआर करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यापाठोपाठ रामवाडी ते विमानतळ आणि वाघोलीपर्यंत मेट्रोचा विस्तार करावा असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी दिला. त्यावरील प्रशासनाचा अभिप्राय स्थायी समितीला आला असतानाच स्थायी अध्यक्षांनी घाईघाईने या दोन्ही मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मंजुरी देत त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गत आठवड्यात स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पौडफाटा ते वारजेपर्यंत मेट्रो करण्यासाठी डीपीआर करण्याचा प्रस्ताव दिला. 

त्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकित स्वारगेट ते खडकवासला मेट्रोचा प्रस्ताव भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांनी दिला, विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली होती. त्यानंतर भाजप नगरसेवकाकडून घाईघाईने हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याचबरोबर स्वारगेट ते हडपसर या मार्गाचा प्रस्ताव भाजपच्या रंजना टिळेकर यांनी तर कात्रज ते वारजे-शिवणे असा मेट्रोचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरे यांनी मांडला. यासर्व मार्गाच्या डीपीआर करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी उडविली खिल्ली

सत्ताधारी भाजप नगरसेवकांकडून मेट्रोच्या डीपीआर करण्याची जी घाई सुरू आहे, त्याची पालकमंत्री गिरीश बापट यांनी हल्ली कोणी उठतो आणि मेट्रोची मागणी करतोय या शब्दात खिल्ली उडविली.

डीपीआरवर लाखोंची उधळपट्टी

एकिकडे श्रेयवादासाठी प्रत्येक मार्गावर मेट्रोची मागणी होत आहे. स्थायी समितीकडून त्यास डीपीआर करण्यास मंजुरीही दिली जात आहे. मात्र, पाच किमीच्या डीपीआरसाठी 70 लाखांचा खर्च येत असल्याने यावर मार्गांचा डीपीआरसाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करावा लागणार आहे. धक्कादायक म्हणजे दिल्ली मेट्रोने केलेल्या सर्व्हेत अन्य मार्गाचा डीपीआर करण्यात आलेला आहे.