Tue, May 21, 2019 12:40होमपेज › Pune › पालिका सभेत 258 कोटींच्या वर्गीकरणास मंजुरी

पालिका सभेत 258 कोटींच्या वर्गीकरणास मंजुरी

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:50AMपिंपरी : प्रतिनिधी  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2018-19 च्या अर्थसंकल्पातील वर्गीकरणाच्या सुमारे 258 कोटी रुपयांच्या विषयाला उपसूचनांसह बुधवारी (दि. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. या वर्गीकरणास राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने विरोध नोंदविला. त्यावरून विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन गोंधळ घातला. दरम्यान, वर्गीकरणाचे विषय मागे घेण्यात यावेत, असे पत्र आयुक्तांनी शुक्रवारी (दि. 22) दिले होते. 

जून महिन्याच्या तहकूब सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.19) झालेल्या सभेत आयत्यावेळी तब्बल 264 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे विषय मंजूर केले होते. त्या विषयाची सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली होती. बुधवारी (दि.20) झालेल्या सर्वसाधारण सभेत ‘वन-के’ खाली वर्गीकरणाचे 5 विषय आयत्यावेळी दाखल करून घेतले होते. त्या विषयावर शुक्रवारीच्या (दि. 22) सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली.

दरम्यान, त्याच दिवशी रात्री आयुक्तांनी वर्गीकरणाचे पाचही विषय मागे घेण्याचे पत्र महापौरांना दिले होते. या 5 पैकी क्रमांक 19 चा इंद्रायणीनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाचा विषय मागील सभेने तहकूब केल्याने त्यावर निर्णय घेता येणार नसल्याचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी स्पष्ट केले. विषय क्रमांक 20 ला सीमा सावळे यांनी उपसूचना देऊन इंद्रायणीनगरातील 3 रस्त्यांचे कामांची वर्गीकरण शून्य करण्याचा उपसूचना दिली. त्यास आशा शेंडगे यांनी अनुमोदन दिले. उर्वरित चार विषय विरोधकांचा विरोध डावलून मंजूर केले. 
दरम्यान, विषय क्रमांक 20 वर मतदान घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. त्यानुसार झालेल्या मतदानात उपसूचनेसह मंजूरीच्या बाजूने 66 तर विरोधात 37 मते मिळाले.

महापौरांनी हा विषय मंजूर केला. त्यानंतर लगेच 21 क्रमांकाचा विषय देखील मंजूर केला. त्याला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोरील हौद्यात धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. या गोंधळातच महापौरांनी विषय क्रमांक 22 व 23 मंजूर करून टाकले आणि सभा संपल्याचे घोषित केले. त्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

जाब विचारल्याने संदीप वाघेरे यांच्या तरतुदींना मान्यता : पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील विविध तरतूद वर्गीकरणाच्या कामांना  स्थायी समितीच्या मंजुरीने सर्वसाधारण सभेकडे न पाठविण्यात आले नाहीत. प्रभागातील विकासाची कामे जाणीवपूर्वक डावलली गेल्याची बाब भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी महापौर कार्यालयामध्ये झालेल्या पक्षाअंतर्गत बैठकीमध्ये संताप व्यक्त केला. वाघेरे यांनी स्थायी समिती सदस्य विलास मेडिगेरी, सागर आंघोळकर, पक्षनेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना जाब विचारला. विकासाच्या कामासाठी खो कोणामार्फत घालण्यात येत आहे, असा जाब विचारला. 

छत्रपती  शिवाजी महाराज पुतळा, भैरवनाथ मंदिर, पिंपरी गाव स्मशानभूमी, पवनेश्वर मंदिरासमोर बहुउद्देशीय इमारत, त्रिलोक स्मशानभूमी, डिलक्स चौक व वैभवनगर लगतचा 15 मीटर डीपी रस्ता ठिकठिकाणी सुलभ शौचालय ही एकूण 9 कोटी रुपयांची तरतूद  वर्गीकरणाची कामे   देण्यात आली होती. 15 मीटर डीपी रस्त्याला शीर्षक नसल्याने या कामास मान्यता मिळाली. परंतु इतर 6 कामांना मान्यता जाणीवपूर्वक दिली गेली नसल्याचे लक्षात आल्याने महापौर कार्यालायामध्ये वाघेरे संतापले. महापौर काळजे यांनी मध्यस्थी केली. त्यानुसार सभेत विषय क्रमांक 23 नुसार सदर सहा विषय मंजुरी देण्यात आली.